रस्त्यांचे काय झाले? दोषी कंत्राटदारांना किती दंड केला? आदित्य ठाकरे यांचा मान्सूनच्या तोंडावर महापालिकेला सवाल

पावसाळा तोंडावर आला. 18 जानेवारी 2023 पासून सुरू केलेल्या रस्त्यांचे काम कुठपर्यंत पूर्ण झाले? विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना किती दंड केला? असे सवाल शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मान्सूनच्या तोंडावर मुंबई महानगरपालिकेला विचारले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी आज एक्स सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली. गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या रस्ते बांधणीच्या कामाची सद्यस्थिती काय आहे, असा सवाल करतानाच आदित्य ठाकरे यांनी रस्ते बांधणीच्या कामाला विलंब केला म्हणून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रांना किती दंड केला त्याचीही माहिती मिळावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली.

आदित्य ठाकरे यांनी दुसरा सवाल वॉर्ड अधिकाऱयांच्या नियुक्तीबाबत केला आहे. मुंबईतील 24 पैकी सुमारे 15 वॉर्डांमध्ये पूर्णवेळ वॉर्ड अधिकारीच नाहीत. ही बाब आपण अनेकदा लक्षात आणून दिली होती. त्यावर काय कार्यवाही झाली, असे आदित्य ठाकरे यांनी विचारले आहे.

अंधेरीच्या मिलन सब वेमध्ये पावसाळय़ाच्या काळात पाणी साचते. महाविकास आघाडी सरकार असताना 2021 मध्ये मिलन सब वेजवळ भूगर्भात रेन वॉटर होल्डिंग टँक बनवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. 2023 च्या मध्यावधीत ते पूर्ण व्हायला हवे होते. त्याची काय स्थिती आहे, असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हाच प्रयोग आपण गांधी मार्केट आणि हिंदमाता येथे केला होता, असेही त्यांनी नमूद केले आहे.