अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. त्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी या वेळी महायुती सरकारसह केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, गृह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत, त्यांना मैदान मोकळे केले तर कुठल्याही गुन्हेगाराला ते पकडू शकतात. सैफचा हल्लेखोर ठाण्यात जाऊन चिखलात लपला होता. तरीही पोलिसांनी त्याला पकडले. वाल्मीक कराडलाही पोलीस पकडू शकत होते. पण कदाचित गृह खात्याची इच्छा नसेल म्हणून त्याला शरण यावे लागले, अशी खिल्लीही आदित्य ठाकरे यांनी उडवली.
बांगलादेशी माणूस आपल्या राज्यात लपत असेल, पुणावर तरी हल्ला करत असेल तर काय म्हणायचे? बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी? असे सवालही आदित्य ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केले. भाजपाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी बांगलादेशी हटाव, अशी घोषणा देत मोर्चे काढले होते. सलग तीन वेळा केंद्रात भाजपची सत्ता आहे. तशीच स्थिती महाराष्ट्राचीही आहे. महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे सोडली तर उरलेला काळ त्यांचीच सत्ता आहे. केंद्रात गृह मंत्री भाजपाचे आहेत, राज्यात गृहमंत्री भाजपाचे आहेत. मग मोर्चा काढून सगळ्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले पाहिजे की तुमचे सरकार अकार्यक्षम आहे का? ते आपली सीमा सुरक्षित करू शकत नाहीत का? असे आदित्य ठाकरे म्हणाले.
एका बाजूला चीन घुसखोरी करतेय, दुसरीकडे देशात बांगलादेशी घुसत आहेत आणि बांगलादेशात हिंदू आक्रोश करत आहेत की आम्हाला न्याय द्या. मात्र त्यावर भाजपा किंवा केंद्र सरकार काहीही बोलत नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी या वेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरही टीकास्त्र सोडले. इस्कॉनच्या पुजाऱ्यांनाही तिथे अटक केली होती, पण केंद्र सरकारने काहीच केले नव्हते. त्याच भाजपच्या सरकारमध्ये सैफवर बांगलादेशीकडून हल्ला होणे ही बाब धोकादायक असून यावरून केंद्र व राज्य किती अपयशी ठरलेय याचे मोजमाप करता येऊ शकेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सैफचा बांगलादेशी हल्लेखोर मिंध्यांच्या जिल्ह्यात
सैफचा बांगलादेशी हल्लेखोर ठाण्यात लपला होता यावरूनही आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. बांगलादेशी नागरिक हिंदुस्थानात आला, कोलकात्यातून मुंबईत आला आणि खोके सरकारच्या माजी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात राहिला, यावरून काय समजावे, असे ते म्हणाले.