बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असूनही मोदी सरकार गप्प का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत आहेत. अत्याचार होत आहेत. मग केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गप्प का आहे, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सत्य जाहीर करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नियंत्रणाखालील बीसीसीआयने एक महिन्यापूर्वी बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता त्या वेळी आपण हाच प्रश्न उपस्थित केला होता. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले व अत्याचार होताहेत हे खरे आहे की नाही असे आपण म्हटले होते, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत हे खरे असेल तर प्रत्येक हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकीतही आम्हाला हिंदुत्वाचा संदेश देणारे गप्प का आहेत? भाजपचे केंद्र सरकार गप्प का? किमान आता तरी परराष्ट्र मंत्रालय बोलेल आणि सत्य सांगेल का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

बांगलादेशात संयुक्त राष्ट्र शांती सेना तैनात करा – ममता

बांगलादेशात होत असलेला अल्पसंख्याक समुदायावरील अन्याय रोखण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशात संयुक्त राष्ट्र शांती सेना तैनात करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात वैयक्तिक हस्तक्षेप करावा असेही ममता यांनी म्हटले.