मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यातील खरा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरे यांचा निशाणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते राहत असलेल्या राम हॉटेलबाहेर सोमवारी सकाळी भाजपच्या काही चिल्ल्यापिल्ल्यांनी आंदोलन केलं. मात्र त्याच वेळी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात पोहोचलेल्या शिवसैनिकांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले. यावेळी पोलिसांकडून शिवसैनिकांवर लाठीचार्ज करण्यात आला.

या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. ”काल आम्ही जे पंतप्रधानांसमोर आंदोलन केलं ते एका विकृतीच्या विरोधात होतं. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे देशातील मोठं पद आहे. माझ्याकडे कोणतं पद आहे. माझ्या हॉटेलबाहेर येऊन आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी काल आमच्यासोबत त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन करायला हवे होते. महाविकास आघाडी विकृतीच्या विरोधात आंदोलन करते. तर ते लोकं विकृतीच्या बाजुला राहून आंदोलन करते. यांनी सांगावं की यांनी अद्याप वामन म्हात्रेला पक्षातून का काढले नाही, एखाद्या पत्रकाराला तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखं बोलतेयस, असं म्हणनं देखील गुन्हा आहे. मग त्यांना का अजून पक्षात ठेवले आहे. किसन कथोरेंवर का कारवाई झाली नाही. जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करता. त्यांना अटक करता. पण ज्याने अत्याचार केले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दहा दिवस लागले. पीडितेच्या आईला दहा तास पोलीस ठाण्यात बसवलं. आम्ही त्या विरोधात आंदोलन करतोय”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”कधीही काहीही घटना घडल्या की पहिला पोलिसांवर कारवाई होते. मी पोलिसांना दोष देत नाही त्यांना आदेश दिलेले असतात. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाच्या इथे जो लाठीचार्ज झाला तो कुणाच्या आदेशाने झाला होता? वारकऱ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला होता? बदलापूरमध्ये आंदोलन करत होते त्यांना राजकीय बोलण्याचा निर्लज्जपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवला. त्या आंदोलकांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यातील खरा जनरल डायर कोण? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.