
मुंबईतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी एकामागून एक प्रकल्प आणले जात असताना काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन मात्र व्हीआयपींचा वेळ मिळत नसल्याने लांबवले जाते. घाटकोपर-रमाबाई आंबेडकर कॉलनी उड्डाणपुलाबाबतही असाच प्रकार केला गेला असून त्यावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी बोट ठेवले आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.
घाटकोपर-रमाबाई आंबेडकर कॉलनी उड्डाणपुलाची दुसरी लेन तयार होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. तरीही ही लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यावरून ही मार्गिका लोकांसाठी कधी खुली करणार, कशासाठी थांबला आहात, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री साहेब, कृपया आदेश द्या, व्हीआयपींसाठी न थांबता, तो मार्ग लोकांसाठी खुला करा, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून केली आहे. तयार असलेले मार्गिकेचे पह्टोही आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केले आहेत.
तीन पूल यंदा होणार खुले
अंधेरीतील गोखले पुलाचा दुसरा भाग 30 एप्रिल रोजी खुला केला जाणार असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर विक्रोळी पूल 31 मे रोजी आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा असा कर्नाक पूल 10 जून रोजी वाहतुकीसाठी खुला करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. विक्रोळी पुलाचे काम जून 2024पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र ही डेडलाईन हुकली होती. दरम्यान, शीव स्टेशनजवळील पूल 31 मे 2026पर्यंत वाहतुकीस खुला केला जाईल, असे सांगण्यात येत असले तरी या पुलाचे काम अजूनही संथगतीने सुरू आहे.