
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत महायुती सरकारच्या धोरणांची चिरफाड केली. विकासाच्या नावाने जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि महाराष्ट्राचा विनाश करतंय हे सरकार, या विरोधात राष्ट्रपतीपर्यंत जाऊ. पण आम्ही महाराष्ट्राचा विनाश होऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा देत महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी होणाऱ्या लाखो झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्राचं वाळवंट करू असं भाजपने ठरवून टाकावं, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंबईत पाण्याचा प्रश्न किती बिकट झाला आहे आणि किती बिकट या सरकारने करून ठेवलेला आहे, हे एक आठवड्यापूर्वीच मी सांगितलं होतं. अनेक ठिकाणी पाहत होतो पण्याचा दाब कमी होता, दुषित पाणीपुरवठा होत होता. यासोबत टँकरचा संप होता. म्हणजे महावीर जयंती, हनुमान जयंती, आंबेडकर जयंतीला मुंबईकरांचे हाल झाले होते. मुख्यमंत्र्यांनी लक्ष उशिरा दिलं का? का दुर्लक्ष केलं मुंबईकडे? कदाचित त्याचं उत्तर मुख्यमंत्री देणारही नाहीत? ठिकठिकाणी जे स्थानिक विभाग होते. प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा देऊन आधीच उचललं, मज्जाव केला, बंदी केली. आणि हे सगळं होत असताना एकाबाजुला महाराष्ट्रात, मुंबईत गुन्हेगारी वाढत चालली होती. पण या सरकारने पोलिसांचं पूर्ण लक्ष हे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या कार्यकर्त्यांवर ज्यांनी जनतेचे प्रश्न घेऊन, पाण्याचे प्रश्न घेऊन वॉर्ड ऑफिसवर जाब विचारण्यासाठी मोर्चा काढला होता त्यावर वळवलं. अनेक ठिकाणी हा मोर्चा काढला गेला. स्थानिक नागरिकांनी देखील याच्यात मोठा सहभाग घेतला होता. यापुढच्या आठवड्यात जिथे-जिथे मोर्चे व्हायचेत तिथे आम्ही काढणारच आणि ज्यांना जाब विचारायचा आहे त्यांना विचारणारच. कारण या आधी कधीही अशी परिस्थिती एप्रिलमध्ये, मार्चमध्ये उद्भवली नव्हती. या सगळ्या गोंधळामुळे झोपडपट्ट्यांना असं वाटायला लागलं की हायराईज बिल्डींग आमचं पाणी घेताहेत. हायराईज बिल्डींगना असं वाटातंय चाळींमध्ये आमचं पाणी घेताहेत. आणि सामाजिक वाद जो कधी मुंबईच्या रहिवाशांमध्ये नव्हता हा वाढायला लागला आहे. पण हे सगळं होत असताना अजून एप्रिल पूर्ण झालेला नाही. आणि तापमान जे आहे चाळीस पार झालेलं आहे. चारसो पार सरकारने केलं… पण 42, 43 तापमान व्हायला लागलं आहे. नाशिक, पुणे, ठाण्यात उष्णता वाढायला लागली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“गारगाई धरणाचा प्रस्ताव, पाच लाख झाडांची कत्तल होणार”
एकाबाजूला मध्यंतरी अवकाळी पाऊस होऊन गेला. वातावरणीय बदल काय आहे? हे आपण डोळ्यादेखत पाहत आहोत. आपण अनुभवतोय. तरी देखील काल स्टेट वाइल्ड लाइफ बोर्डच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक असे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत, ज्याने लाखो झाडांची कत्तल आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट असेल, कधी शहरांमधील उष्णता असेल, उष्माघातामुळे होणारे मृत्यू असतील किंवा इतर काही दुष्परिणाम असतील हे सगळं एकाच कारणामुळे होतंय ते म्हणजे वातवरणीय बदल. कालच्या स्टेट वाइल्ड लाइफ बोर्डच्या बैठकीत अनेक असे प्रस्ताव आणलेत ज्याच्यात फटाफट फटाफट झाडांची कत्तल होणार आहे. खरं तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ‘एसंशि’ सरकारने किंवा त्यांच्या घटनाबाह्य सरकारने मुंबई, पुणे, ठाणेसह अनेक ठिकाणी कितीतरी झाडांची कत्तल केली आहे. याचं आता कुठेही मोजमाप लागणार नाही. तरीही कालच्या बैठकीतील दोन चार गोष्टी आहेत. त्यात गारगाई धरणाचा प्रस्ताव आहे. पाच लाख झाडांची कत्तल होणार आहे. का? तर धरण बांधायचं आहे, मुंबईला 450 एमएलडी पाणी आणायचं म्हणून. गंमत बघा, ज्या कारणामुळे तिथे पाऊस पडतो तेच कारण नष्ट करून टाकायचं. पर्यावरणातील बदल आपण पाहतोय, जंगलच नष्ट करून टाकायचं. मुंबईची मान्सून डिपेंडन्सी वाढवायची. आणि पाच लाख झाडांची कत्तल करून धरण बांधायचं, कशासाठी 450 एमएलडी पाणी आणायला. मान्य आहे 450 एमएलडीची गरज आहे. पण जो आम्ही डीसॅलीनेशनचा प्लांट (समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं रुपांतर पिण्याच्या पाण्यात ) आणणार होतो. त्या डीसॅलीनेशनचा प्लांटमध्ये एकही झाड न कापता दोन वर्षांमध्ये डीसॅलीनेशनच्या प्लांटने आपल्याला 450 एमएलडी पाणी हे मुंबईला पिण्यासाठी दिलं असतं. त्यापुढे जाऊन काही थोडा अजून खर्च झाला असता तरी देखील तीन वर्षांत आपण 600 एमएलडी पर्यंत जाऊ शकलो असतो. हे गारगाई धरण होणार कधी? सुरुवात कधी? होणार कधी? म्हणजे पुढची दहा वर्षे. हे तर एका बाजूलाच राहिलं. पण ‘सुप्रमा’वर ‘सुप्रमा’ म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर एस्केलेशन करतात आधीपण असा घोटाळा झालाय, नंतरपण आता कदाचित होऊ शकतोय. पैशांचा खेळ हा तुमच्या आमच्या भवितव्याशी, भविष्याशी खेळत आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
“गडचिरोलीमध्ये एका मायनिंग प्रोजेक्टसाठी दीड लाख झाडांची कत्तल होणार”
अशाच प्रकारे गडचिरोलीमध्ये मायनिंगचा प्रस्ताव आणलेला आहे. गारगाईसाठी जसं ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पाच लाख झाडांची कत्तल होणार आहे. गडचिरोलीमध्ये एका मायनिंग प्रोजेक्टसाठी दीड लाख झाडांची कत्तल होणार आहे. चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपास मर्की मंगली मायनिंग प्रजोक्ट, जो मायनिंग ब्लॉक आहे, हा मी पर्यावरण मंत्री असताना हा रद्द केला होता. याला बाजूला ठेवलं केलं होतं. मर्की मंगली 1 किंवा मर्की मंगली 2 मायनिंग प्रोजेक्ट असेल उद्धवसाहेबांनीही सांगितलं होतं की, एकही जंगल कापता येणार नाही. कालच्या बैठकीत हे देखील घाईघाईत मान्य करून टाकलं. त्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, तिथे हा मर्की मंगली प्रोजेक्ट आहे. टिपेश्वर, पैनगंगा या संपूर्ण परिसरावर निगेटिव्ह इम्पॅक्ट करणार आहे. लाखो झाडांची कत्तल होणार आहे. हा त्यांचा दुसरा प्रस्ताव होता, असे आदित्य ठाकरे म्हणालेय.
तिसरं जर पाहिलं तर चंद्रपूर-नागपूर हायवे. इथेही तसंच आहे. ताडोबा, कान्हेगाव या वन्यजीव प्रकल्पांमधून हा हायवे जाणार आहे. पुणे-नाशिक हायवेचंही असंच आहे. विकास विरोधी आम्ही कोणी नाही, पण आम्ही विनाश विरोधी आहोत. कारण यातून आपल्या महाराष्ट्राचा विनाश होतोय. कदाचित भाजपने असं ठरवून टाकावं की आम्ही महाराष्ट्राचा वाळवंट करून टाकू. म्हणजे झाडांसाठी कोणी लढणारे राहणारच नाही. आणि भविष्यात बाकी काही कोणाला जगायला मिळणारच नाही. कारण कॉन्ट्रॅक्टर्स मजा करून बाकिचे भाजप नेत्यांची मुलं दुबई, युके, युएसमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत. तशी हे पळापळ करतील आणि बाहेर जातील. तुम्ही आणि आम्ही इकडची सामान्य जनता त्याचे दुष्परिणाम भोगणार आहोत, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
मागच्या आठवड्या धक्का बसणारी गोष्ट म्हणजे कोस्टल रोडचा उत्तरेच्या दिशेने होणार विस्तार आहे. त्यासाठी वसई-विरारच्या आसपास 60 हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. एकवेळ भाजप, फडणवीस आणि सरकार सांगेल की, हा विकास आहे. पण सगळ्यात मोठी बातमी आहे ठाण्यातली, हा कुठचा विकास आहे? हे देखील आम्हाला सांगावं. ठाण्यात एका बिल्डरसाठी झाडं कापण्याची परवानगी दाखवण्यासाठी झाडांची वयंच कमी दाखवली आहे. म्हणजे 100 वर्षांपूर्वीची झाडं 10-15 वर्षांपूर्वीची दाखवली जात आहेत. या पर्यावरण खात्यात देखील हे कोण घोळ करत आहेत? मंत्र्यांना कोण फसवतंय का? ही संस्था आहे त्याच्यात काही चुकीच्या परवानग्या येत आहेत का? त्याच्यात या बिल्डरवर क्रिमिनल केस होणार आहे का? हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? याचं देखील उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे. आज जशी ही पत्रकार परिषद घेतली तसं दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना भेटण्याची गरज असेल त्यांना भेटू. पण हा सगळा जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि महाराष्ट्राचा विनाश करतंय हे सरकार, आम्ही राष्ट्रपतीपर्यंत जाऊ. पण महाराष्ट्राचा विनाश आम्ही होऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.