मुंबईकरांचा पाणीप्रश्न सोडवा, आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत केली मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांचे विविध प्रश्न पालिका आयुक्तांसमोर मांडले. मुंबईकरांना कधी कमी दाबाने पाणीपुरवठा, तर कधी दूषित पाणी पुरवठा, पाणीकपात अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत महापालिकेने लोकांना समक्ष उत्तर द्यावे व या समस्यांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.

तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील कोस्टल रोड प्रकल्पाचे काम 2023 च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण झाले असते. मात्र, शिंदे सरकारच्या दिरंगाईमुळे अजूनही या कामास विलंब होत आहे. रस्त्याचा उर्वरित भाग त्वरित सुरू करावा, अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

मागील दोन वर्षांत शिंदे सरकारने विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून मुंबईची अक्षरक्षः लूट केली. यातील सर्वात मोठा रस्ते घोटाळा मी उघड केला. या घोटाळ्याविषयी निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली आहे. यासोबतच राज्य सरकारकडे थकीत असलेल्या 16,000 कोटींची रक्कम मिळवण्यासाठी महापालिकेने आग्रह करण्याची विनंती त्यांनी केली. जेणेकरून बेस्ट आणि इतर नागरी सुविधांसाठी हा निधी उपलब्ध होईल.