वरळीतील वीज, वाहतुकीच्या समस्या सोडवा, आदित्य ठाकरे यांच्या महाव्यवस्थापकांना सूचना

वरळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लाइटचा लपंडाव आणि ‘बेस्ट’ बसेसच्या समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्यांचा आढावा घेऊन तातडीने या समस्या सोडवा, अशा सूचना आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना दिल्या.

‘बेस्ट’ प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे वरळीकरांना गेल्या अनेक दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकदा गेलेली वीज परत येण्यासाठी तब्बल दहा ते बारा तासांचा वेळ लागत आहे. याचा कामावर विपरित परिणाम होत आहे. शिवाय ‘बेस्ट’ बसेसच्या कमतरतेमुळे प्रवाशांना तासन्तास रखडून राहावे लागत आहे. यामुळे कामावर जाणाऱया नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वरळीकरांकडून आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत आदित्य ठाकरे यांनी आज ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक डिग्गीकर यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. यावर महाव्यवस्थापकांनी सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार सुनील शिंदे, माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर उपस्थित होते.

बेस्टला पालिकेने मदत करावी

मुंबईची लाइफ लाइन असलेल्या बेस्टला पालिका मदत करण्यास नकार देते, मात्र एमएमआरडीएला पाच हजार कोटी देऊ शकते. त्यामुळे बेस्ट वाचवण्यासाठी पालिकेने बेस्टला मदत करावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. सरकारकडून बारावी, पदवीधारकांसाठी होणाऱया घोषणा म्हणजे ‘चुनावी जुमला’ असल्याचा आरोपही त्यांनी केला. युवकांना सहा ते बारा हजार देणार, मग आशा सेविका, महिला, अंगणवाडी सेविकांना का देत नाही, असा सवालही त्यांनी केला. राज्यात निवडणुकांच्या तोंडावर सरकारच्या माध्यमातून हिंसक आंदोलन सुरू असल्याचेही ते म्हणाले. मुनगंटीवार यांनी दहा दिवस इंग्लंडमध्ये सुट्टी घालवून फक्त वाघनखे आणल्याचे जाहीर केले. त्याच्या सुट्टीच्या दौऱयाचा खर्च कोण देणार, असा सवाल केला.

शिवसेनेची सरकारकडे जोरदार मागणी, भाजपने भूमिका स्पष्ट करावी

आर उत्तर विभागातील डी. पी. प्लॅनमध्ये अजूनही येथील लोकसंख्येच्या मानाने पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. त्यात जर धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला ही जागा देण्यात आली तर येथील परिस्थिती अजून बिकट होईल. दहिसर येथील नागरिकांच्या मनातदेखील या प्रकल्पाबाबत तीव्र नाराजी आहे. म्हणूनच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा धारावी पुनर्वसन प्रकल्पाला स्पष्ट विरोध आहे. याबाबत भाजपचे स्थानिक खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही घोसाळकर यांनी भाजपला दिले आहे.