
देशात पारदर्शी आणि निष्पक्ष पद्धतीने निवडणुका पार पडाव्यात यासाठी विरोधी पक्ष म्हणून जे काही करता येईल ते आम्ही करतोय. त्यासाठी न्यायालयात आणि रस्त्यावरही लढाई लढत आहोत. मात्र निवडणूक आयोग हाच भारतीय जनता पक्षाचा एक घटक पक्ष बनला आहे. इलेक्शन फ्रॉड, ईव्हीएम फ्रॉडमुळे मते कुठे जातात हेच कळत नाही. भाजप आणि निवडणूक आयोग यात काही फरक उरलाय का? असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 47 लाख मतदार वाढवले गेले व मतदानाच्या शेवटच्या क्षणात साधारणपणे 76 लाख मतदार वाढले. हे मतदार आले कुठून, असा सवालही त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात ‘इंडिया’ आघाडीतील अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर आज दुपारी त्यांनी माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत, खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव, संजय देशमुख, राजाभाऊ वाजे आदी होते. केजरीवाल यांच्या भेटीपूर्वी आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या 15 सफदरजंग लेन निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांच्यासह खासदार प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होत्या.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी ईव्हीएम घोटाळ्याचा उल्लेख करत भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका केली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार पडले किंवा पाडले गेले त्यांची फेरमोजणीची मागणीही निवडणूक आयोगाने पूर्ण केली नाही. त्यातील काही लोक न्यायालयातही गेले आहेत, असे सांगतानाच, ईव्हीएममधील गडबडीबाबत आयोगाने स्पष्ट करायला हवे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 47 लाख मतदार वाढवले गेले व मतदानाच्या शेवटच्या क्षणात साधारणपणे 76 लाख मतदार वाढले त्याबद्दल निवडणूक आयोगाने काहीच म्हटलेले नाही. जर आयोगाने त्यावर उत्तर दिले असेल तर व्हिडीओ फुटेज दाखवा, वेळ उलटून गेल्यानंतर मतदान करायला टोकन दिले जातात ते किती जणांना दिलेत ते दाखवा, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले. शिवसेना, ‘आप’ किंवा काँग्रेससोबत जे झालेय ते उद्या कदाचित बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याबाबत होईल, आरजेडी, चंद्राबाबू यांच्याबरोबरही होईल. भाजप प्रत्येक स्थानिक पक्ष फोडून भाजपची सत्ता स्थापन करेल, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच पुढील रणनीती म्हणून ‘इंडिया’ आघाडीसाठी वरिष्ठ नेते रोडमॅप तयार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र फोडणाऱ्यांचे कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावरून झालेल्या टीकेबद्दल माध्यमांनी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह चोरण्याचे पाप केले, महाराष्ट्रात येणारे उद्योग पळवण्याचे पाप केले. आम्ही कुठेही, कशासाठी गेलो तेव्हा जाहीर केलेले आहे. कधीही महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी, महाराष्ट्र लुटण्यासाठी, विकासाला दूर करण्यासाठी कुणाचे कौतुक केलेले नाही. जे महाराष्ट्राला लुटतात, सरकार आणि पक्षांची चोरी करतात, कुटुंबे फोडतात त्यांचे कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना सोडणारे ‘जय महाराष्ट्र’ नाही जय गुजरात करताहेत
उपनेते राजन साळवी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मिंधे गटात प्रवेश केला असे माध्यमांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, शिवसेना सोडून जाणारे ‘जय महाराष्ट्र’ नाही तर जय गुजरात करत आहेत. जो व्यक्ती केसेसना घाबरून भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी पळून जातो तो कधीच जय महाराष्ट्र बोलू शकत नाही. करायची तेवढी पह्डापह्डी करा, पण निवडणूक जाहीरनाम्यात जनतेला दिलेली आश्वासनेही पूर्ण करा, असा टोलाही त्यांनी महायुतीला लगावला. या पह्डापह्डीचा माध्यमांनी ऑपरेशन टायगर असा उल्लेख केल्याबद्दलही आदित्य ठाकरे यांनी खिल्ली उडवली. ऑपरेशन टायगर म्हणजे शिवसेना कुणाला फोडतेय का, असा मिश्कील सवालही त्यांनी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्याकडे पाहून विचारला. शिवसेनेचे काही खासदार मिंधे गटाच्या खासदाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला गेले यावर बोलताना, अधिवेशन चालू असल्यामुळे एकमेकांना भेटणे होते आणि कुणी कुणाला भेटायचे हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत अदानी कर लावल्यास शिवसेना कडाडून विरोध करेल
देवनारच्या डंपिंग ग्राऊंडची जागा उद्योगपती अदानींनी ढापली आहे. त्यावरील कचरा उचलायला महानगरपालिकेला तीन हजार कोटी रुपये लागणार आहेत. अदानींची खासगी जमीन स्वच्छ करायला मुंबईकरांवर महापालिका कर लादणार आहे. प्रत्येक मुंबईकरावर यूजर फी प्रस्तावित केलेली आहे. पण शिवसेना त्याला कडाडून विरोध करेल, असा इशाराही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला. महायुती सरकार साखर कारखान्यांच्या थकबाकीसाठी 79 कोटींचा खर्च करणार आहे, तर दुसरीकडे शिवभोजन आणि शालेय विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनातील अंडी व खीर बंद करणार आहे. त्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. सरकार लहान मुलांच्या मिड-डे मिलमधून अंडी आणि खीर काढतेय आणि राजकीय लोकांची थकबाकी भरतेय, हे कोणते ऑपरेशन, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.