
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य मुंबईकर भरडले जात असताना पालिकेकडून आता ‘युजर फी’च्या नावाखाली कचऱ्यावर कर लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईकरांवर हा ‘घनकचरा कर’ लावू नये, अशी मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना निवेदन दिले आहे.
घनकचरा संकलन, वाहतूक प्रक्रिया आणि विल्हेवाट यावरील वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने नागरिकांकडून वापरकर्ता शुल्क (युजर फी) वसूल करण्याचा निश्चय केला आहे. मात्र मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांवर आधीच विविध कर-शुल्कांचा भर असताना अजून एक ‘अदानी कर’ लादल्यामुळे नागरिकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषही आहे. त्यामुळे हा कर लागू करण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे हा कर मुंबईकरांवर लादू नये, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.