वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती न दाखवता कठोर दंड व्हायलाच हवा! आदित्य ठाकरे यांची मागणी

राज्याच्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मंगळवारी प्रश्नोत्तरांच्या तासात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाहतुकीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. वाहतूक सुरक्षिततेकडे त्यांनी परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच रोड रेज करणाऱ्यांना, बेफिकीरीने वाहने हाकणाऱ्यांना आणि उलट्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती न दाखवता कठोर दंड व्हायलाच हवा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.

याबाबत एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात, गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत मी परिवहन मंत्र्यांना विचारलं की, ते रस्त्यावर अधिक वाहतूक पोलिस तैनात करण्यास तयार होतील का, जेणेकरून वाहतूक सुरक्षिततेसाठी तिथल्या तिथे हस्तक्षेप करणारं कोणी असेल? असेही त्यांनी विचारले आहे.

जे बेफिकीरीने वाहन चालवतात, उलट्या दिशेने वाहन चालवतात किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, त्यांना प्रत्यक्ष थांबवून कठोर दंड करण्यात येईल का? मंत्र्यांच्या उत्तराने मी पूर्णतः समाधानी नव्हतो, पण मला आशा आहे की शासन रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची उपस्थिती वाढवेल, जेणेकरून वाढत्या वाहतूक नियम भंगांवर नियंत्रण ठेवता येईल आणि त्यामुळे होणारे अपघात रोखता येतील. रोड रेज करणाऱ्यांना, बेफिकीरीने वाहने हाकणाऱ्यांना आणि उलट्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती न दाखवता कठोर दंड व्हायलाच हवा, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.