
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाच्या पर्यावरण किंवा वायू प्रदूषणाशी संबंधित कोणत्याही परिषदा किंवा बैठकांना उपस्थित राहात असाल तर, तुमची फसवणूक होत आहे. तुम्हाला जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक वसुंधरा दिन साजरे करण्यासाठी देखील आमंत्रित केले जाईल. पण हे फक्त ‘ग्रीन वॉश’ आहे दुसरे काहीही नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारच्या पर्यावरणविरोधी धोरणावर घणाघात केला. आदित्य ठाकरे यांनी लिंक्डइनवर ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमधून आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरणविरोधी धोरणांबाबत युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांची Linkedin पोस्ट. नक्की वाचा!@AUThackeray https://t.co/RcGZpecevv
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 29, 2025
गेल्या आठवड्यात, महाराष्ट्र सरकारने अशा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ज्यामुळे जंगले तोडली जातील, हिरवळीचे आच्छादन मोठ्या प्रमाणात कमी होईल, धोक्यात असलेल्या वनस्पती प्राण्यांना आणखी धोका निर्माण होईल आणि पारंपरिकपणे धोक्याची घंटा वाटेल. महाराष्ट्राला वाळवंटात नाही तर, रुक्ष प्रदेशात रुपांतरित करण्याची ही प्रक्रिया वेगवान होईल. हिरवळीचे आच्छादन म्हणजे फक्त झाडे नाही तर जंगलेही आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
गारगाई धरणासाठी होणार 5 लाख झाडांची कत्तल!
मुंबईची तहान भागवण्यासाठी गारगाई धरणाचा प्रस्ताव आहे. या धरणाशाटी पाच लाख झाडांची कत्तल होणार आहे. या कत्तलीमुळे तानसामधील वन्यजीवन पूर्णपणे नष्ट होणार आहे. हे धरण बांधायला 7-10 वर्षे लागतील. या धरणातून मुंबईला 450 एमएलडी पाणी पुरवठा होईल. सर्वात मूर्खपणा म्हणजे अर्थकारणाच्या नावाखाली 5 लाख झाडे तोडून मुंबईला मान्सूनवर अवलंबून ठेवत आहे. आमच्या सरकारने सुरू केलेला डिसॅलिनेशन प्लांट उभारण्याची तयारी केली होती. पण गेल्या 2 वर्षांत भाजपने पाठिंबा दिलेल्या घटनाबाह्य सरकारने तो प्रकल्प रद्द केला. डिसॅलिनेशन प्लांटमधून मुंबईला 2026 पासून 450 एमएलडी पाणीपुरवठा सुरू झाला असता. ते खर्चाच्या अगदी कमी प्रमाणात आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे प्रस्तावित क्षेत्रात एकही झाड न तोडता. पण कंत्राटदार आणि भ्रष्टाचारावर चालणाऱ्या सरकारला हे पटले नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
अशाच प्रकारे महामार्ग प्रकल्पांमध्ये, व्यघ्र प्रकल्पांमध्ये खाणींसाठी लाखो झाडे तोडली जाणार आहेत. महाराष्ट्राचा वाळवंट करण्यासाठी आणि कंत्राटदार लॉबीचा फायदा करण्यासाठी भाजपने विकासाच्या नावाखाली जंगलतोडीसाठी निविदा मागवण्याचे बाकी राहिले आहे. महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेले 2 महामार्ग वन्यजीव अभयारण्य आणि व्याघ्र अभयारण्यांमधून जातात आणि त्यांचा या वन्यजीवांवर थेट नकारात्मक परिणाम होईल. पूर्वीच्या सुज्ञ सरकारांनी जंगले आणि अभयारण्ये का तोडली नाहीत? याचे एक निश्चित कारण नेहमीच होते, जे भाजप सरकारांना दिसत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांचे जिणे मुश्किल करायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा हल्ला
अशा अविचारी नियोजनाचे आणखी एक उदाहरण म्हणजे कोस्टल रोडच्या उत्तरेतील विस्ताराचे काम, ज्याचा मूळ आराखडा 25 टक्के देखील पूर्ण झालेला नाही. तरीही सरकार 60 हजार खारफुटीची झाडे तोडून हा कनेक्टर उत्तरेकडे वाढवण्यास उत्सुक आहे आणि त्यात एका पसंतीच्या कंत्राटदाराला काम देण्यास उत्सुक आहे. वरील सर्व गोष्टी उभारल्या जात असताना पुण्यात नदीकाठचा विनाशकारी प्रकल्प राबवला जात आहे, कदाचित जगातील हा पहिला प्रकल्प आहे जिथे नद्या अरुंद करून त्या उथळ केल्या जात आहेत. तसेच वेताळ टेकडी प्रकल्प जिथे स्थानिक भाजप नेत्याच्या पत्नीने असे बोगदे आणि मेट्रो बनवण्याची योजना आखली आहे ज्यामुळे टेकड्या नष्ट होतील किंवा नागपूरमध्ये आखण्यातील अजनी वन विनाशाची योजना. सर्वांचा एकच मुद्दा आहे – शहरे भकास बनवणे, तर कंत्राटदारांना मालामाल करणे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
महानगरपालिका स्तरांवर मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, कोल्हापूर किंवा इतर कोणत्याही मोठ्या शहरात बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या राजकीय भागीदारांच्या फायद्यासाठी किती झाडे तोडली जातात याची गणनाही कोणाकडे नाही. ठाण्यामधीलच उदाहरण घ्या ना, कायद्यानुसार जुने वृक्ष तोडण्याची एक विशिष्ट किंमत असते जर, ती कापण्याची परवानगी असेल तर, एका विशिष्ट बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी कागदोपत्री झाडांचे वय कमी दाखवले आहे, जेणेकरून त्या विशिष्ट बांधकाम व्यावसायिकाला फायदा होईल. हा प्रभावशाली बांधकाम व्यावसायिक कोण आहे आणि तो खर्च का टाळत आहे. तो जुन्या झाडांना तोडून अशा बेजबाबदार वर्तनातून नफा मिळवण्यास उत्सुक असेल तर? हे तेच लोक आहेत जे आपली शहरे धुळीत मिसळून परदेशात स्थायिक होतील, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
सरकारला हे लक्षात येत नाही की, त्याने झाडाचे वय कमी झाले नाही तर, शहराच्या जीवनमानाचा दर्जाही घसरला आहे. लोभी राजकारणी, लुटारू कंत्राटदार यांच्या अभद्र युतीने महाराष्ट्रावरील हिरव्यागार आच्छादनाशी ही अविचारीपणे केलेल्या छेडछाडीने आपले राज्य प्रदूषणाच्या छायेत ढकलले जातआहे. आपल्या राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना आता महाराष्ट्रात यायचे नाही. परदेशात चांगली जीवनशैली मिळवणाऱ्यांना आता इथे राहायचे नाही. आपल्यापैकी ज्यांच्याकडे पर्याय नाही, त्यांना भाजप सरकार जात, प्रदेश, धर्म या राजकीय लढाईत गुंतवून ठेवेल आणि जर तुम्ही त्यापासून दूर राहिलात तर ते तुम्हाला हवामानाच्या नावाखाली भव्य परिषदा आणि कार्यक्रमांना आमंत्रित करतील. त्यांच्या जाळ्यात अडकणे हे आपल्या पिढीचे सर्वात मोठे पतन असेल. हवामान बदल हा आपल्या काळातील सर्वात मोठा धोका आहे. गरिबी, शेतीविषयक संकट, नागरी अशांतता हे सर्व त्यातून उद्भवणारे आहे, विशेषतः हिंदुस्थानमध्ये, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सणसणीत टोला लगावला.