मालकाला खुश करण्यासाठी भाजपला मुंबई अदानी समूहाला द्यायचीये; मलबार हिलमधील 170 कोटीच्या भूखंड खरेदीवरून आदित्य ठाकरेंचा घणाघात

मुंबईतील मलबार हिलमधील 1 एकरचा भूखंड अदानींच्या कंपनीने 170 कोटी रुपयांत खरेदी केला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि अदानी समूहावर सडकून टीका केली आहे. कारमाइकल रोडवर एक प्लॉट आहे जो गार्डनसाठी राखीव होता. तो प्लॉट 170 कोटी रुपयांना अदानीला विकण्यात आला. मुंबई महापालिकेने त्यावर आक्षेप घेतला होता. पण हा आक्षेप सरकारने डावलला. म्हणूनच भाजपला मुंबई जिंकायची आहे. तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही, यांच्यासाठी नाही तर फक्त अदानीसाठी त्यांच्या मालकासाठी, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही टीका केली.

याशिवाय आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी एक्सवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमधूनही आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपाचे मालक असलेले अदानी भाजपाकडून हवं ते करवून घेताना दिसताएत. पण ह्यात जीव आपल्या मुंबईचा जातोय! म्हणूनच ह्यांना मुंबईचा ताबा हवाय! त्यांच्या मालकाला खुश करण्यासाठी भाजपाला मुंबई अदानी समूहाला द्यायचीये, कायदे बदलून! आता विचार करा, भाजपाच्या खोट्या प्रचाराला बळी पडून आपली मुंबई ह्या भामट्यांच्या हातात देणार का?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

काय आहे प्रकरण?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समूहाची उपकंपनी असलेल्या माह-हिल प्रॉपर्टीजने दक्षिण मुंबईतील मलबार हिलमधील कारमाइकल रोडवरील एक एकरचा भूखंड 170 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. त्यासाठी 10.5 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. कारमाइकल रोडचा परिसर म्हणजे दक्षिण मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू वस्ती मानली जाते. हा परिसर देशातील सर्वांत महागड्या मालमत्तांपैकी एक असल्याचे सांगण्यात येते.

काय कडक कारवाई होणार? सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाबत आदित्य ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म CRE Matrix ने मिळवलेल्या नोंदणी दस्तऐवजानुसार, या मालमत्तेचे वारस बेहराम नौरोसजी गमाडिया यांनी अलिकडेच माह-हिलला 4,500 चौरस मीटरचा भूखंड विकला. 27 मार्चला हा व्यवहार झाल्याची नोंद आहे. खरेदीदाराने 10.5 कोटीची स्टॅम्प ड्युटीही भरली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या माह-हिल प्रॉपर्टीजने मालमत्तेच्या खरेदीला मंजुरी देणाऱ्या ठरावाची एक प्रत ज्यात कंपनीचा पत्ता अहमदाबादमधील अदानी कॉर्पोरेट हाऊस असा दिलेला आहे.

अतिशय दाट झाडी असलेला हा प्लॉट गार्डन म्हणजेच चिल्ड्रेन पार्कसाठी 1991 च्या विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आला होता. पण 2017 मध्ये त्यावरील आरक्षण उठवून रहिवासी जागेत बदल करण्यात आला होता. त्यावेळी या विरोधात स्थानिकांनी आंदोलनही केले होते.