महायुतीत भांडणं व्हायचीच बाकी, मंत्रिमंडळ विस्तारावरून आदित्य ठाकरे संतापले

23 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला बहुमत मिळूनही देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अद्याप मंत्रिमंडळ जाहीर न झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपचे नेते कुठल्याही थराला जाऊ शकतात, महायुतीत मंत्रिपदावरून भांडणसुद्धा होईल असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाने स्पष्ट बहुमत देऊनसुद्धा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापन करण्यासाठी 10 दिवस लागले. आता कुणाला किती मंत्रिपदं मिळतील यासाठी ते वेळ लावत आहेत. मंत्रिपदावरून त्यांच्यांत भांडणसुद्धा होईल. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपचे नेते कुठल्याही थराला जाऊ शकतात, लोकांची कामं खोळंबली आहेत जनता वाट बघू शकते पण आधी या राजकारण्यांची सत्तेची भुक मिटणे गरजेचे आहे. ही शरमेची बाब आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.