एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी निधी नाही पण मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी नाहीये पण मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच स्वतःचा स्वार्थ साधणारं सरकार आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांना 56% च पगार दिला जात असल्याचं गेल्या आठवड्यात आपण पाहिलंच, तसंच महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल होणार असं दिसतंय. सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी नाहीये, शेतकरी आत्महत्या वाढल्या असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी निधी नाहीये, लाडक्या बहीणींना निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी निधी नाहीये, आरोग्य व्यवस्था, औषधांचा पुरवठा ह्यासाठी निधी नाहीये.

परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे,मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी निधी आहे, उपमुख्यमंत्री कोल्हापूरात म्हणाले तसं मंत्र्यांच्या ताफ्यातील नवीन गाड्या खरेदीसाठी निधी आहे, लाडक्या कंत्राटदारांसाठी निधी आहे, भव्यदिव्य सोहळ्यांसाठी निधी आहे, जाहिरातींसाठी निधी आहे. नवीन एसटी बसेस घेण्यासाठी, म्हणजेच कंत्राटांसाठी निधी आहे. ह्यातून काय दिसतंय? निवडणुक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं हे सरकार जनतेचं भलं करणारं सरकार नसून, स्वतःचा स्वार्थ साधणारं सरकार आहे! असेही आदित्य ठाकरे म्हणाले.