मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आधीच सोडवता आला असता, टँकर संपावरून आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका

टँकर चालकांवर कुठलाही दंड आकारला जाणार नाही असे पालिकेने जाहीर करावे असा मार्ग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी टँकर संपावर सुचवला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आधीच सोडवता आला असता असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, टँकर संपात सहभागी झालेल्या लोकांशी आम्ही चर्चा केली. त्यातून एकच मार्ग निघतो तो म्हणजे पालिकेने टँकर चालकांना आश्वासन द्यावे की 15 जून नव्हे तर अनिश्चित काळासाठी त्यांच्यावर दंड आकारला जाणार नाही.

मुंबई महानगरपालिका यावर तोडगा काढेल अशी मला आशा आहे. मुंबईकर पाण्यावाचून तडफडत आहेत याची भाजप सरकारला बिलकूल चिंता नाही. केंद्र सरकारने भूजलबाबत काही नियम तयार केले आहेत. हे नियम इतर शहरांना लागू होऊ शकतात पण मुंबईची गोष्ट वेगळी आहे.

गेल्या चार वर्षांपासून हा मुद्दा धूळखात पडला आहे. पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी अचानक टँकर मालकांवर दंड आकारायला सुरुवात केली आहे. मुंबईत महावीर जयंती, हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सुरू असताना टँकर चालकांना संप करावा लागला.

भाजप नेता, मुंबई द्रोही व्यक्तीने हे जाणून बुजून केले नसेल ना? सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे, त्यांना फटका बसावा म्हणून हे षडयंत्र कुणी रचलं नसेल ना? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

केंद्र सरकार यावर दखल घेऊन मुंबईसाठी काही नियमांत बदल करतील. अशा वेळी मुंबईला काय हवंय हे सरकारला माहितच नाही. तसेच मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आधीच सोडवता आला असता, यासाठी आम्हाला आंदोलन, मोर्चा काढावा लागला नसता हे दुर्दैवं आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.