महाराष्ट्रातून पळवलेल्या प्रकल्पांचा गुजरातमध्ये रोड शो हा जखमेवर मीठ चोळणारा, आदित्य ठाकरे यांची टीका

डबल इंजिन सरकारमध्ये दोन्ही इंजिन फेल झालेत अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्पांचा गुजरातमध्ये रोड शो हा जखमेवर मीठ चोळणारा असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, काही दिवसांतच लक्ष्मी पूजन साजरा होणार आहे. पण भाजप महाराष्ट्रातली लक्ष्मी खेचून नेत आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वडोदऱ्यात रोड शो झाला. या रोड शोमध्ये स्पेनचे राष्ट्राध्यक्षही होते. कुठल्याही देशासोबत संबंध असणे गैर नाही. पण ज्या कारणासाठी हे तिथे होते, ते कारण आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे होते. महाराष्ट्रातून एअरबस टाटा हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. जेव्हापासून घटनाबाह्य सरकार आमच्या डोक्यावर बसले आहे तेव्हापासून आम्ही फक्त प्रत्येक प्रकल्पाला टाटा करत आहोत. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राज्याला कुठलाही प्रकल्प येत नाहिये. वेदांता फॉक्सकॉन, मेडिकल डिव्हाईस पार्क, बल्क ड्रग पार्क असे अनेक प्रकल्प एकनाथ शिंदे आणि भाजपने गुजरातला ढकलून दिले आहेत.

नवी मुंबई विमानतळावर जे विमान उतरवलं होतं तशी विमानं गुजरातमध्ये असेंबल होतील. अशी विमानं देशात असेंबल होतील मॅन्युफॅक्चर नाही. त्यामुळे हे मेक इन इंडिया नसून असेंबल इंडिया आहे. पण हे महाराष्ट्र म्हणून विचार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. एअर इंडियाच्या 600 नोकरभरतीसाठी 25 हजार तरुण तरुणी मुंबईत आले होते. पोलीस कॉन्स्टेबलसाठी साडे हजार पदं असताना साडे 17 लाख तरुण तरुणी मुंबईत या नोकरीसाठी आले होते. टाटा एअरबस नागपूरच्या मिहानमध्ये आणणार होतो. हा प्रकल्प नागपूरमध्ये आला असता तर काही वाईट झालं नसतं. पण भाजपच्या हट्टामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला. भाजप किती मस्तीत आहे, भाजपने ठरवलं आहे की महाराष्ट्र भाजपला मतदान करो वा न करो, भाजप महाराष्ट्राला एकही चांगला प्रकल्प येऊ देणार नाही. पण महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या तरुण तरुणींना काय वाटतं याचा भाजपला फरकच पडत नाही. काल वडोदऱ्यात झालेला रोड शो हा आमच्या जखमेवर मीठ चोळणारा होता.

एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारचं षडयंत्र 

मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे बेस्ट. बेस्ट आणि मुंबई महानगरपालिकेची एक करार झाला होता. त्यात कमीत कमी 3 हजार 337 बसेस चालवणे ही अट होती. पण सर्वसामान्यांना बस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवून मुंबईचे अर्थचक्र मारण्यासाठी या बसेस कमी केल्या आहेत. अजूनही मुंबईत बेस्टमधून दिवसा 33 ते 35 लाख लोक प्रवास करतात. मुंबईत साडे तीन हजार बसेस धावत असताना एकनाथ शिंदे यांनी या बस अडीच हजार वर आणल्या आहेत. हे सरकार असंच टिकलं तर या बसेसची संख्या अडीचशेवर येईल. ऐन सणांच्या वेळी सरकारने मिनी बस बंद केल्या आहेत. सणांच्या दिवशी मेगाब्लॉक ठेवायचा आणि दुसरीकडे या बसेस कमी केल्या आहेत. 2027 पर्यंत आम्ही उद्दिष्ट ठेवले होते की बेस्टमध्ये सर्वांचे पगार वेळेत होतील, बोनस, पेन्शन होणार. तसेच 2027 पर्यंत बेस्टसाठी 10 हजार इलेक्ट्रिक बस आणि 900 डबल डेकर बस मुंबईत आणायच्या होत्या. पण आमचं सरकार पडलं आणि हे बंद झालं. मुंबईत हे षडयंत्र आहे. मुंबईत एकही रस्ता झालेला नाही, घोटाळा करून त्यातून पैसे काढले. फूटपाथवर खड्डे आहेत. आधी मेगाब्लॉक आणि त्यात बसच्या संख्या कमी केल्या. त्यामुळे कष्टकरी मुंबईकरांना खासगी वाहनं वापरायला एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार भाग पाडलं हे षडयंत्र आहे.

दोन्ही इंजिन फेल

भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा मुंबईवर दुष्ट डोळा असून ते मुंबईला मारायला निघाले आहेत. परराष्ट्र मंत्र्यांना मी सांगू इच्छितो की जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि केंद्रात भाजपचं बहुमताचं सरकार होतं तेव्हाही आम्ही मॅग्नेटीक महाराष्ट्राचे कार्यक्रम केले होते आणि साडे सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली होती. भाजपप्रणित एकनाथ शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्रात एक नवा रुपयाही आलेला नाही. या डबल इंजिन सरकारमध्ये दोन्ही इंजिन फेल झालेले आहे.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राविरोधात काम करत आहेत. पण नागपूरमध्ये येऊ घातलेला प्रकल्पही गुजरातला गेला. म्हणजे फडणवीस जिथून निवडून येतात त्या नागपूरच्याविरोधात फडणवीस काम करत आहेत. म्हणून नागपूरमध्ये परिवर्तन होणार.

उद्धव ठाकरे यांनी कुटुंब प्रमुख म्हणून सगळ्यांना जपलं, पक्षाच्या पलीकडे जाऊन जपलं. उद्धव साहेब यांनी वनगा यांना शब्द दिला होता आणि तो पाळला होता. म्हणूनची ही गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी ही लढाई आहे.

नवाब मलिक यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. याप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे. कारण दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संबंध ठेवणार नव्हते, इक्बाल मिरचीचे काय झालं? या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केल्या होत्या, स्वतःला तुरुंगात जायचं नव्हतं म्हणून त्यांनी पलटी खाल्ली होती आणि गुजरातला पळून गेले होते. येणार सरकार हे मुंबईला मारणारं नसावं. येणार सरकार संपूर्ण महाराष्ट्राचं हित जपणारं असावं.