महाविकास आघाडीच्या काळात शिवडी कनेक्टरचे एका वर्षात 48 टक्के काम झाले होते, पण महायुतीच्या काळात हे काम फक्त 57 टक्क्यांपर्यंत झाले होते अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच भाजप आणि मिंधेंच्याच काळात विकास कामं रखडली अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सी लिंकवरून नॉर्थ बाऊंडची रहदारी अजून दिसली नाही. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर कोस्टल रोडचं संपूर्ण काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला असता. यासोबतच नरीमन पॉईंट कफ परेड आणि कनेक्टर आणि वरळी शिवडी कनेक्टर MTHL चे उद्घाटनही उशिरा सुरू झाले कारण त्यांना वेळ नव्हता. हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. नॉर्थ बाऊंड कनेक्टर सुरू झाला आहे ही चांगली बाब आहे. कोस्टल रोड अजूनही पूर्ण झालेला नाही. अनेक बोगदे पूर्ण व्हायचे बाकी आहेत. या प्रकल्पांना उशीर का होत आहे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
तसेच आमचं सरकार असताना कोस्टल रोड आणि अटल सेतूला जोडणारा वरळी शिवडी कनेक्टवर आम्ही नेहमी बैठका घेतल्या. आमच्या सरकारच्या काळात या मार्गाचे एका वर्षात 48 टक्के काम केलं. गेल्या वर्षी अजित पवारांनी सभागृहात सांगितलं की 57 टक्के काम पूर्ण झालं आहे. भाजप आणि मिंधेंच्या काळात कामं रखडली आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढच्या वर्षीपासून दावोसमध्ये मुंबई महानगरपालिकेनेही जावं. तिथे Land Premium गोळा होतात, कर गोळा होतात त्याच्यावरही करार करावा. MMRDA ने बिल्डरांसोबत करार केले आहेत, ज्या बिल्डरांनी जमिनी घेतल्या, त्यांनी कामं सुरू केली, त्यांच्यासोबत काय Mou करणार तुम्ही? उद्योगमंत्री 20 तारखेला महाराष्ट्रा पॅवेलियनच्या उद्घाटनाला उशिरा पोहोचले. त्यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांना थांबवून ठेवलं होतं. 21 तारखेला काही बैठका केल्या आणि 22 तारखेला परत आहे. एका दिवसाच्या बर्फाच्या दौऱ्यासाठी राज्य सरकारने त्यांचे पैसे भरणे योग्य आहे का? गुंतवणूक झाली पाहिजे फसवणूक नाही. काही चांगले करार झाले त्यात दुमत नाही. पण इथल्याच लोकांशी तिथे जाऊन करार करायचे यातून राज्याला फायदा होत नाही असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.