वरळी बीडीडी चाळीचे तोडकाम करताना अक्षम्य निष्काळजीपणा, म्हाडाच्या बेजबाबदार कंत्राटदारावर कारवाई करा; आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुनर्विकासासाठी म्हाडाच्या कंत्राटदाराकडून मंगळवारी वरळी बीडीडी चाळ क्र. 90 चे तोडकाम करण्यात आले, मात्र हे तोडकाम करताना कंत्राटदाराने आजूबाजूच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नाही. रहिवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या बेजबाबदार कंत्राटदाराविरोधात कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

म्हाडाच्या माध्यमातून वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने चाळी तोडण्यात येत असून त्या जागी गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत. मंगळवारी चाळ क्र. 90 चे तोडकाम म्हाडाने नेमलेल्या कंत्राटदाराकडून करण्यात आले. मात्र हे तोडकाम करताना सुरक्षिततेसंबंधी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. या तोडकामाचे फोटो शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलेय, आज वरळी बीडीडी चाळ क्र. 90 पाडण्यात आली. मात्र हे तोडकाम करताना म्हाडा कंत्राटदाराने सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. स्थानिकांनी याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.

म्हाडाच्या निष्काळजीपणाकडे लक्ष घाला

सुरक्षा उपाययोजना न करता चाळ पाडल्यानंतर आता राडारोड्याभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्ष तोडकाम करताना हे बॅरिकेड्स लावण्याची आवश्यकता होती. हा विषय राजकारणाच्या पलीकडचा असून सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. म्हाडाच्या या निष्काळजीपणाकडे आपण व्यक्तिशः लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.