
शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज एखाद्या कसलेल्या संसदपटूप्रमाणे विधानसभेत आपली प्रतिभा दाखवली. सभागृहात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना टाळाटाळ करणाऱ्या पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची त्यांनी भंबेरीच उडवली. खातं कळलं नसेल तर अभ्यास करून उत्तर द्या, अशा आदित्य ठाकरे यांच्या हजरजबाबी टोल्याने गुलाबरावही गर्भगळीत झाले. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने विधानसभा अध्यक्षांना हस्तक्षेप करत गुलाबरावांचे वैयक्तिक स्वरूपाची वक्तव्ये पटलावरून काढून टाकण्याचे आश्वासन द्यावे लागले.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात, राज्यातील सात जिह्यांमध्ये भूजल नायट्रेटचे प्रमाण रोखण्याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील सारवासारव करत होते. तसेच तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कृषीमंत्री, पर्यावरण मंत्री यांच्याशी एक बैठक लावू आणि काही पर्याय निघतो का ते पाहू, असे ते रोहित पवार यांना म्हणाले.
त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी याच विषयाला पुन्हा हात घातला. ते म्हणाले, ‘आम्ही विरोधी पक्षात असलो तरी काही चांगलं करायचं असेल तेथे सहकार्य करू. मंत्र्यांनी उत्तरात सांगितले की, अन्य खात्यांसोबत बैठका लावू. याचा अर्थ यांना खाते कळलं आहे की नाही? सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही मंत्री उत्तरे देऊ शकत नाहीत, त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा आणि मंत्र्यांना अभ्यास करून उत्तर देण्याची सूचना करावी’, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी अध्यक्षांकडे केली.
त्यावर गुलाबराव यांनी, तुमच्या वडिलांना कळलं होतं म्हणून हे खातं दिलं असे सांगितले. आदित्य ठाकरे यांनीही त्याला प्रत्युत्तर देताना, …म्हणूनच तुम्ही पळून गेलात असे त्यांना सुनावले. भास्कर जाधव यांनी मंत्र्यांना समज द्यावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. त्यावर चूक सुधारण्याचा दिखावा गुलाबरावांनी केला. या खडाजंगीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करत, कोणावरही वैयक्तिक टिप्पणी करणे चुकीचे आहे आणि मी ते रेकॉर्डवरून काढून टाकणार, असे सांगितले.
भास्कर जाधव यांनी उतावळ्या राम कदमांना सुनावले
विधानसभेत माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जप करत सातत्याने आरोप करणारे भाजप आमदार राम कदम यांच्यावर आज शिवसेना गटनेते भास्कर जाधव अक्षरशः तुटून पडले. आक्षेपार्ह विधाने करून नेत्यांची चापलुसी केली म्हणजे नेते खूश होत नाहीत, तर पक्षाची बदनामी होते याचे भान राखून बोला, असे त्यांनी कदम यांच्यासह सर्वच उतावळय़ा आमदारांना सुनावले.
‘सभागृहाचे सदस्य राम कदम यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली. त्यावेळी मी पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला होता. आपण मला उपस्थित करण्याची संधी दिली नाही. मी घसा पह्डून सांगत होतो, पण अध्यक्ष महोदयांनी दुर्लक्ष केले. विरोधक संख्येने कमी आहेत, पण लोकशाहीची शान म्हणून त्यांनाही महत्त्व असायला हवे,’ असे जाधव म्हणाले. ‘सभागृहाचे सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरेंचे वारंवार नाव घेतले. वाटेल ते आरोप केले. ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला या सभागृहात येऊन आपल्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा करता येत नाही, त्याचा नामोल्लेख या सभागृहात होता कामा नये हा नियम आहे की नाही? ही प्रथा आहे की नाही? हे पावित्र्य पाळले गेलेय का?’ अशी प्रश्नांची सरबत्तीच भास्कर जाधव यांनी केली.