शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे आज भायखळा मतदारसंघात मुस्लिम बांधवांकडून जोरदार स्वागत झाले. शिवसेना हिंदुत्ववादी आहे, पण हृदयात राम आणि हाताला काम हे शिवसेनेचे हिंदुत्व आहे, जातीधर्म न पाहता सेवा करणे हाच शिवसेनेचा महाराष्ट्रधर्म आहे अशा भावना व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांच्या प्रेमाला प्रतिसाद दिला.
भायखळा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मनोज जामसुतकर यांच्या प्रचारासाठी भायखळ्याच्या मदनपुरा भागात सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी धर्म आणि जातीच्या नावाखाली समाजात भांडणे लावणाऱ्या भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
भाजपाचे हिंदुत्व निवडणुकीसाठी आहे. स्वतःची मुले परदेशात पाठवतात शिक्षण घ्यायला, व्यवसाय करायला. कारण त्यांना माहीत आहे इथे भविष्य नाही. पण आमच्या मुलांमध्ये भांडणे लावतात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. भाजपचा हा डाव अपयशी करण्यासाठी तरुणांना चांगले शिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. युवा नोकरी मागायला जातो तेव्हा त्याच्यावर कोणत्याही धर्माचा शिक्का नसतो, तो फक्त एक बेरोजगार असतो, असेही ते पुढे म्हणाले.
महाराष्ट्रातल्या नोकऱ्या गुजरातला पळवून नेल्या जात आहेत, असे टीकास्त्र सोडताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘सर्व युवा पिढी मिंधे आणि भाजपला विचारतेय. म्हणतेय की तुम्ही सर्व स्वतःसाठी घेतले, खोके घेतले, पदे घेतली, मुख्यमंत्री पद घेतले पण आमच्यासाठी काय? आम्हाला नोकरीही नाही. हे आजचे वास्तव आहे.’ गुजरात आणि गुजरातींशी माझे भांडण नाही, पण महाराष्ट्राच्या हक्काचा रोजगार तुम्ही पळवत असाल तर मला लढावे लागेल आणि मी माझ्या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी लढणार, असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
भाजपा देशभक्त नाही, लुटारू
आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात अन्याय होतोय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री इथे येऊन म्हणतात की, बटोगे तो कटोगे. त्यामुळे सावध रहा. आपण आपल्या धर्मात, जातीजातींमध्ये विखुरले गेलो तर भाजपा आपला खिसा कापून घेईल. भाजपा हिंदुत्ववादी नाही, देशभक्तही नाही…ते फक्त आक्रमक आहेत, लुटारू आहेत, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. कोविडच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जात-धर्म न पाहता जनतेसाठी काम केले याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
महाराष्ट्राची एकता तोडण्याचे काम करणाऱ्यांना तुरुंगात टाकू
शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आमदार यामिनी जाधव भायखळ्यातून मिंधे गटाच्या उमेदवार आहेत. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, भायखळ्यातल्या गद्दार लोकसभेत पडल्या आणि आता म्हणताहेत मंत्री बनणार, पण त्या पुन्हा निवडूनच येणार नाहीत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. जे जे लोक महाराष्ट्रधर्माची एकता तोडण्याचे काम करत आहेत त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. सर्वात चांगले फुटबॉल प्लेयर मदनपुरात आहेत. मदनपुरातील टॅलेंट देशासाठी खेळतेय, असे कौतुकोद्गारही त्यांनी यावेळी मदनपुरातील फुटबॉलपटूंसाठी काढले.