मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला. धारावी पुनर्विकासावरून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही आमक्रम भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधताना धारावी झोपडपट्टी पुनर्विकासावरून सत्ताधारी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर हल्लाबोल केला. धारावी पुनर्विकास कोणासाठी आहे? हा विकास अदानी समूहाचा होतोय की धारावीचा? असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
कुठल्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही. काही चांगलं काम करत असेल, तर विरोध नाही. पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षाही भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू आहे. मुंबईत सध्या चार की पाच टाउन प्लॅनिंग अथॉरिटी आहेत. आमचं स्वप्न आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर मुंबई महापालिकेलाच टाउन प्लॅनिंग अथॉरिटी करू. पण धारावीमध्ये एखादी परवानगी घ्यायची असेल किंवा प्रस्तावित योजना असेल तर टाउन प्लॅनिंग अथॉरिटी, डीआरपी, मुंबई महापालिका किंवा एमएमआरडीए यांनी 15 दिवसांत अदानी समूहाला उत्तर दिले नाही तर अदानी समूह म्हणेल, अदानी म्हणतील तेच खरं ठरेल आणि तसंच केलं जाईल, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
नवीन कायदा राज्यात आणि देशात कशासाठी आलेला आहे? काय नक्की आपण पुनर्विकास करतोय? चंद्रावर काम करतोय का? मुंबईसह देशात अनेक पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. पण कोणाला अशा सवलती मिळाल्या नाहीत. मिहिर कोटेचा जे सतत खोटं बोलत असतात तेच म्हणाले आम्ही लोकसभा निवडणुकीच्या आधी जीरआर रद्द करून घेऊ. स्थानिकांनीही आंदोलन केलं होतं. कुर्ल्यांमध्ये राहणाऱ्यांचा धारावीच्या पुनर्विकासाला विरोध नाही. मुलुंडच्या नागरिकांचाही धारावीकरांना किंवा धारावीच्या पुनर्विकासाला विरोध नाही. मुद्दा हा आहे की ज्या जमिनी दिल्या जात आहेत, मिठागरं, डंम्पिंग ग्राउंड, ऑक्ट्राय नाका असेल कुर्ल्यातील मदर डेअरीचा प्लॉट असेल किंवा मुलुंडमध्ये जे प्लॉट दिलेले आहेत ते किती वर्षे तुम्ही अदानी समूहाला देणार आहात? असा रोखठोक सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी साधलेला संवाद!@AUThackeray pic.twitter.com/JnrfTQ7Vhm
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 4, 2024
वरळी बीबीडीमध्ये जिथे मोकळी मैदानं होती तिथे नवीन इमारती बांधल्या जात आहेत. आणि मग जुन्या इमारती पाडून मोकळं मैदान करण्यात येत आहे. असंच धारावीमध्ये शक्य आहे. डीआरपीचा आम्हीही अभ्यास केला. तिथे ट्रान्झीट बाहेर न उभारता तिथल्या तिथेच ट्रान्झीट बनवता येईल. धारावीतील जवळपास एक लाख कुटुंबांना अपात्र ठरवण्याची भीती महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आहे. मग नक्की हा विकास कोणाचा होतोय? हा विकास अदानी समूहाचा होतोय की धारावीचा? जीआर रद्द करा आणि मुंबईच्या हिताचे जीआर आणावेत, ही आमची मागणी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
गुजरातचं आक्रमण सुरू आहे, महाराष्ट्रात लूट सुरू आहे. मुंबई तोडू शकत नाही म्हणून अदानी समूहाच्या घशात घालायची, हे आम्ही कदापी होऊ देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. तीन महिन्यांत आमचं सरकार आल्यानंतर हा विकास आम्ही करूच. कोणाचाही उलट सुलट फायदा न करू देता मुंबई आणि धारावीसह महाराष्ट्राचा विकास कसा होईल, यावर आम्ही लक्ष केंद्रीत करू, असा ठाम विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.