अमेरिकेच्या टॅरिफवर सरकार अजूनही गप्प, एक देश म्हणून आपण या आव्हानाचा सामना कसा करू, ते सांगा? आदित्य ठाकरेंचा सवाल

“अमेरिकेच्या टॅरिफवर सरकार अजूनही गप्प, एक देश म्हणून आपण या आव्हानाचा सामना कसा करू शकतो, ते सांगा”, असा सवाल शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला विचारला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रेट अमेरिकाचा नारा देत जगभरातील 100 देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली. यातच हिंदुस्थानावरही ट्रम्प सरकारने 26 टक्के टॅरिफ लादला आहे. यावरूनच आदित्य ठाकरे यांनी X वर एक पोस्ट करत हा सवाल उपस्थित केला आहे.

X वर पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, अमेरिकेच्या टॅरिफवर बहुतेक देश त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि देशावर त्याचा कसा परिणाम होईल यावर चर्चा करत आहेत. पण हिंदुस्थानातील केंद्रीय सरकारने जनतेला वेगळ्याच मुद्द्यात गुंतवले आहे. भाजप सरकारची रणनीती वाद निर्माण करून देशाचे विभाजन करण्याची असल्याची टीका त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, अमेरिकेने लादलेल्या टॅरिफ सारख्या या राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यावर अर्थमंत्र्यांनी संसदेत सविस्तर निवेदन देणं अपेक्षित आहे. या टॅरिफचा हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि त्याला सामोरे जाण्यासाठी सरकारची योजना काय आहे, हे जनतेला कळायला हवं. संसदेत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसह चर्चा आयोजित करून त्यांचं मत जाणून घेणं आणि सर्वांचं समर्थन मिळवणं गरजेचं आहे. पण भाजप सरकारने या राष्ट्रीय आव्हानाकडे पूर्णपणं दुर्लक्ष केलं आहे आणि त्याचे व्यवस्थापन अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

या मुद्द्यावर सरकारने यापूर्वीच चर्चा का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे म्हणाले की, अमेरिकेच्या या टॅरिफचा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर, नोकऱ्यांवर, व्यवसायांवर, तरुणांवर मोठा परिणाम होणार आहे. असं असूनही अजूनही अमेरिकेच्या टॅरिफच्या मुद्द्यांवर सरकार गप्प आहे. कोणावरही टीका करण्याची गरज नाही, पण एक राष्ट्र म्हणून आपण या आव्हानाला कसं सामोरे जाणार आहोत, हे तरी जनतेला सांगायला हवे, असं ते म्हणाले आहेत.