दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार! ‘कोस्टल रोड’ परिसरात होर्डिंगवरून आदित्य ठाकरे आक्रमक; दिला खणखणीत इशारा

मिंधे आणि भाजप सरकारच्या फायद्यासाठी शिवसेनेच्या प्रयत्नाने होणार्‍या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड परिसरातील सुरक्षित मोकळ्या जागांमध्ये आता मिंधे-भाजप सरकारकडून होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी घाटकोपर छेडानगरसारखी होर्डिंग दुर्घटना घडून जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे होर्डिंगचे कंत्राट आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला देण्यासाठी निविदेतही घोटाळा झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मिंध्यांसाठी ‘लाडका कंत्राटदार’ योजना आणू नका असा इशारा देतानाच ‘कोस्टल रोड’ परिसरात होर्डिंगमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार राहील असा इशारा आज शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. शिवसेनेच्या ‘होर्डिंगमुक्त कोस्टल रोड’ संकल्पनेविरोधात जाऊन मिंधे-भाजप सरकारकडून तुटपुंज्या नफ्यासाठी मोकळ्या जागांवर होर्डिंग लावण्यासाठी मंजुरी देण्याचे प्रकार समोर आल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. कोस्टल रोडमुळे निर्माण होणार्‍या गार्डनमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने येणार आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी होर्डिंगमुळे कोणतीही अनुचित घटना घडली तर तुम्ही जबाबदार रहाल असा इशारा त्यांनी आयुक्तांना दिला. शिवाय होर्डिंग निविदेतही आर्थिक अनियमितता आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करावी अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांकडे केली.

‘बेस्ट’ला मदत करा

– मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पालिकेने बेस्टला आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली. शिवाय बेस्टच्या आधुनिकीकरणासाठी, इंधन बचतीसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक बसेस वाढवाव्यात, बेस्टची भाडेवाढ केली जाऊ नये, कर्मचार्‍यांचा पगार आणि पेन्शनची तारीख चुकवली जाऊ नये अशा मागण्याही त्यांनी केल्या.

गणेशोत्सवासाठी आवश्यक तयारी करा!

– मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे मंडळे आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्यांची डागडुजी, आगमन-विसर्जन मार्गातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापाव्यात आणि गणेशोत्सवासाठी पालिकेची आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली.

आदित्य ठाकरेंनी केलेल्या इतर मागण्या

– लोअर परळ येथील उड्डाणपूल नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या पुलावर पदपथ, बस थांबे व जिन्यांची व्यवस्था करावी.

– महापालिकेच्या सर्व महाविद्यालये व रुग्णालयांमधील आंतरवासीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ११ हजारांवरून १८ हजारांपर्यंत वाढवा.

– लोअर परळ खिमजी चाळ क्र. २, सेनापती बापट मार्ग शेजारी असणार्‍या कंपाऊंडला लागून असलेले महाकाय धोकादायक होर्डिंग तातडीने हटवा.

– मिंधे सरकारच्या ११ जानेवारी २०२३ च्या सुचेनेनुसार पालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांच्या ८४९० रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करा.

– रहिवासी, प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी भुलाभाई देसाई रोडवरील श्याम निवास को.ऑपरेटिवव्ह सोसायटीजवळचे बॅरिकेड्स हटवा.