
महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे उद्योग आणि मुंबईतील आर्थिक महत्वाची केंद्रे नरेंद्र मोदी सरकारने गुजरातला पळवली. महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपची भूक अजून शकलेली नाही. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने मुंबईतील ट्रेडमार्क-पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठीच भाजपची ही कारस्थाने सुरू असल्याचा आरोप होत आहे.
ट्रेडमार्क-पेटंट हा महत्त्वाचा विभाग केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. त्याचे मुख्यालय मुंबईत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने हे महत्त्वाचे मुख्यालय मुंबईत ठेवले गेले. परंतु मोदी सरकार ते दिल्लीला हलवणार आहे. मुख्यालयाबरोबर संबंधित अधिकारी व कर्मचारीवर्गही दिल्लीला हलवला जाणार आहे. तत्पूर्वी सर्व प्रलंबित कामे तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचा विरोध
ट्रेडमार्क-पेटंट मुख्यालय मुंबईतून हलवण्यास शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. मुख्यालय मुंबईतून हलवण्यासंदर्भातील केंद्राचे पत्र शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यांनी पेंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्यावर निशाणा साधला.
मुंबईला उद्ध्वस्त करायला निघालेत
मुंबईतून खासदार झालेल्या मंत्र्याने ही कृती करावी हे लाजीरवाणे आहे. ज्या मुंबईने त्यांना निवडून दिले तिलाच ते उध्वस्त करायला निघालेत. भाजपची प्रत्येक कृती मुंबईचा अवमान करते आणि मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळते. केंद्राला मुंबई जो महसूल देते त्यातील मुंबईचा हिस्सा देण्यात यावा असे वाणिज्य मंत्र्यांना वाटत नाही का? ट्रेडमार्क-पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवण्याची गरज काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.