…तोपर्यंत एलफिन्स्टन पूल बंद करू देणार नाही! आदित्य ठाकरे यांचा इशारा

एल्फिन्स्टन पूल बंद करण्याआधी स्थानिक प्रकल्पबाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने ठोस हमी दिलीच पाहिजे. पुनर्वसनाची हमी तसेच गणपतराव कदम मार्ग आणि शीव पुलाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला एल्फिन्स्टन पूल बंद करूच देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी ‘एक्स’च्या माध्यमातून दिला. स्थानिक रहिवासी तसेच पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पूल बंदला विरोध कायम असल्याचे त्यांनी म्हटले.

आदित्य ठाकरे यांनी रविवारी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. जोपर्यंत गणपतराव कदम मार्गाचे काम पूर्ण होत नाही आणि शीव पूल वाहतुकीसाठी खुला होत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला एल्फिन्स्टन पूल बंद करूच देणार नाही. सरकारने एल्फिन्स्टन पुलालगतच्या चाळींच्या पुनर्विकासाची हमी देणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. एमएमआरडीएने साने गुरुजी मार्गाच्या अर्ध्या भागावर काम सुरू केले आहे, याकडे लक्ष वेधत आदित्य ठाकरे यांनी परिसरातील नागरिक व वाहनचालकांच्या होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा उपस्थित केला.

चाळींतील रहिवाशांना घरांची हमी देऊनच पुढे काम करा!

एमएमआरडीएने वरळी-शिवडी कनेक्टर प्रकल्पांतर्गत दोन्ही बाजूला रॅम्प, इतर ठिकाणी गर्डर लाँचिंग ही उर्वरित कामे आधी पूर्ण करावीत. तसेच इतर पूर्व-पश्चिम कनेक्टर खुले केल्यानंतर आणि चाळींतील रहिवाशांना घरांची हमी देऊन वर्षीखेरीस आमच्या सणासुदीचे दिवस संपल्यानंतर एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाची कार्यवाही पुढे नेली पाहिजे, अशी आग्रही भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.

अशा कामांसाठी एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलीस या यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय साधला पाहिजे. नेमका याच समन्वयाचा यंत्रणांमध्ये अभाव आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

वरळी-शिवडी कनेक्टरचे काम आम्ही 2021 मध्ये सुरू केले होते. 2022 च्या मध्यावर आमचे सरकार असेपर्यंत कनेक्टरचे 48 टक्के काम पूर्ण झाले होते. त्यावेळी आम्ही स्थानिक रहिवाशी आणि दुकानदारांना विश्वासात घेऊन उपाययोजना केल्या होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.