गणपतराव कदम मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाचे पाडकाम करा, आदित्य ठाकरे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना पत्र

एल्फिन्स्टन पुलावरील वाहतूक बंद करण्यामुळे नागरिक तसेच वाहनचालकांची मोठी गैरसोय होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त संजय मुखर्जी यांना पत्र लिहिले. लोअर परेल पश्चिमेकडील गणपतराव कदम मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. ते काम पूर्ण झाल्यावरच एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू केलेला वरळी-शिवडी कनेक्टर हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम फेब्रुवारीत करण्याचे निश्चित केले गेले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात होणाऱ्या अडचणींचा विचार करत पुलाचे पाडकाम परीक्षा संपल्यानंतर करण्याची मागणी मी आपणाकडे केली होती. त्याची दखल घेत पाडकाम थांबवून परीक्षा संपल्यानंतरचा कालावधी निश्चित करण्यात आला, असे पत्रात नमूद करीत आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांचे आभार मानले.

तथापि, सध्या गणपतराव कदम मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ते काम पूर्ण झाल्यावरच एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू करणे योग्य ठरेल, जेणेकरून वाहतूककोंडीमुळे नागरिकांची अडचण होणार नाही. याचा विचार करून एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम काही काळासाठी पुढे ढकला, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.