मिंधे सरकारने राबवलेल्या ‘एक राज्य – एक गणवेश’ योजनेतील भ्रष्टाचार समोर आल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ती योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारमधील तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केसरकर यांनी त्या योजनेत मलई खाल्ली होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाच्या आवारात आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘एक राज्य – एक गणवेश’ या योजने अंतर्गत राज्यातील बचत गटांना गणवेश तयार करण्याचे काम देण्यात आले होते, मात्र या गणवेशांचा निकृष्ट दर्जा आणि कमी-जास्त मोजमाप यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पँटला, अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. त्यामुळे ही योजना वादात सापडली होती. सरकारने नवी नियमावली या योजनेसाठी बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केसरकर यांच्यावर निशाणा साधला.
‘एक राज्य-एक गणवेश’ योजनेतील भ्रष्टाचाराबाबत आता फडणवीस सरकारने केसरकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी या वेळी केली. केसरकर मंत्रिमंडळात नसले तरी त्यांच्यावर सरकार काय कारवाई करणार हे आता पहावे लागेल, असे ते म्हणाले.
मिंध्यांनी मुंबईला दिल्लीपुढे झुकवले
मुंबई महानगरपालिका आता बेस्ट प्रशासनाला निधी देणार नसून बेस्टने राज्य सरकारकडून किंवा जागतिक बँकेकडून निधी घ्यावा असे महापालिकेने म्हटले असल्याबद्दल माध्यमांनी या वेळी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, बेस्ट प्रशासनाची जबाबदारी ही सर्वस्वी महानगरपालिकेचीच आहे. मिंधे सरकारने मोदी सरकारच्या सल्ल्यावरून महापालिकेची तिजोरी रिकामी केली. पालिकेच्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या. महापालिकेचा पैसा त्यांनी त्यांच्या आवडत्या कंत्राटदारांसाठी वापरला. मिंधे स्वतः दिल्लीपुढे झुकलेच पण त्यांनी मुंबईलाही झुकवले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
बीडचे प्रकरण आम्ही सोडणार नाही
स्वच्छ कारभार चालवायचा असेल तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यावर कारवाई करावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. बीडचा विषय शिवसेना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पीक विमा प्रकरणाचीदेखील चौकशी व्हायला हवी, असे ते म्हणाले. विधानसभेत बीड प्रकरण आमदार सुरेश धस यांनी सभागृहात मांडले. त्याचा उल्लेख करताना, धस यांनी बीडची गुन्हेगारी व परळी पॅटर्न समोर आणला, असे आदित्य ठाकरे म्हणाले.