महावितरणच्या पोलवर काम करत असताना वीजेचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणाचा मृत्यू हा ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा बळी आहे, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घातला. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच तरुणाचा मृत्यू झाला असून त्या तरुणाच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी. तसेच ठेकेदार आणि महावितरणवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली.
रत्नागिरी शहरातील निवखोल येथील महावितरणच्या पोलवर तुटलेली वायर जोडत असताना वीजेचा धक्का लागून कुंदन दिनेश शिंदे या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आज रत्नागिरीतील वातावरण तापले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत त्यांना धारेवर धरले. तसेच त्यांना जाब विचारण्यात आला. “ठेकेदार कर्मचाऱ्यांना कुठलेही सुरक्षेचे साहित्य पुरवत नाही. एक हॅण्डग्लोज दहाजणांना वापरायला दिला जातो. कुठलीही सुरक्षा पुरवली जात नसल्यामुळेच या तरुणाचा बळी गेला,” असा आरोप शिवसैनिकांनी केला. तसेच यांनी मृत तरुणाच्या नातेवाईकांना ठेकेदार कंपनीने 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि त्याच्या नातेवाईकांना नोकरीत समाविष्ट करुन घ्यावे, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.
यावेळी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संतप्त शिवसैनिकांसमोर फे-फे उडाली. कामगार कल्याण अधिकाऱ्यांना मृत पावलेल्या तरुणाचे नावही सांगता आले नाही. त्याने चुकीचे नाव सांगितले. यावरुन शिवसैनिक अधिकच संतापले. यावरून महावितरणचा गलथान कारभार पुढे आला. तरुणाच्या मृत्यूला ठेकेदार आणि महावितरण जबाबदार आहे. त्यामुळे महावितरण आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शहर पोलीस निरिक्षक महेश तोरसकर यांनी सर्व अहवालानंतर योग्य ती कारवाई आणि गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मृत तरुणाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याबाबत लिहून घेण्यात आले. तसेच महावितरणनेही कारवाई करण्याबाबत लेखी पत्र दिले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने आणि जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.