सोशल मीडियावर ओळख झाल्यावर पहिल्याच भेटीत तरुणाचा मोबाईल लांबवणाऱया तरुणीला अखेर बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. सौम्या मुनीर मलिक असे तिचे नाव आहे. तिला रिल्स बनवण्यासाठी महागडा मोबाईल हवा होता. त्यामुळे तिने तो मोबाईल लांबवल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आणखी एका महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.
सप्टेंबर महिन्यात सौम्याने तक्रारदारांना इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती रिक्वेस्ट पाठवल्यावर त्या दोघांनी मोबाईल नंबर शेअर केला होता. ऑक्टोबर महिन्यात सौम्याने तक्रारदारांना मेसेज करून मालाड येथील एका मॉलमध्ये बोलावले. तिच्यासोबत आणखी एक महिला आली होती. फूड कॉर्नर येथे जेवणाची ऑर्डर केली. तेव्हा सौम्यासोबत आलेल्या महिलेने तिच्यासोबत वाद घातला. त्यानंतर ती महिला रागाच्या भरात निघून गेली. तेव्हा सौम्याने आपल्याकडे मोबाईल नाही आहे, त्या महिलेला फोन करते असे सांगून तक्रारदाराचा मोबाईल घेऊन ती पसार झाली.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे याच्या पथकातील उपनिरीक्षक केंद्रे, गळवे, टिकंडे, मनीषा महाडिक यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तेथील 40 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या फुटेजवरून पोलिसांना सौम्याला ताब्यात घेतले.