सांगलीच्या इस्लामपूर येथून कुर्ला परिसरात विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विकायला आलेल्या एका तरुणाला विनोबा भावे नगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ते शस्त्र हस्तगत करण्यात आले.
एलबीएस मार्गावरील सीएनजी पंपाजवळ एक तरुण सांगलीहून शस्त्र विकण्यासाठी येणार असल्याची खबर व्ही.बी. नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भाऊसाहेब सोनावणे यांना मिळाली. त्यानुसार सोनावणे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. दरम्यान तो तरुण तेथे आल्यावर खबऱ्याने तोच असल्याचे खुणावल्यावर पथकाने त्याला अडवले. मग त्याची अंगझडती घेतली असता त्याने पंबरेला पॅण्टीत खुपसून ठेवलेले विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि खिशात चार जिवंत काडतुसे मिळाली. नितेश मोहिते (25) असे त्या तरुणाचे नाव असून तो हे शस्त्र कोणाला विकणार होता तसेच त्याने हे कुठून आणले होते याचा पोलीस तपास करत आहेत.