कंपनीच्या पैशांनी राजेशाही लग्न केले, मग हनीमून साजरा केला; तरुणाचा कारनामा उघड होताच पोलीसही चक्रावले!

खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने कंपनीच्या निधीवर डल्ला मारत तब्बल 10 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. तो पैसा स्वतःचे राजेशाही लग्न, हनिमून आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला. इतकेच नव्हे तर आपल्या नातेवाईकांच्या खात्यातही पैसे वळते केले. काही पैशांचा शेअर्सच्या विक्रीसाठी वापर केला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक करून दाखल केलेल्या आरोपपत्रात तरुणाच्या या धक्कादायक कारनाम्यांचा उल्लेख केला आहे. हा सर्व गैरव्यवहार उघडकीस येताच पोलिसही चक्रावून गेले आहेत.

राज मुकेश गणात्रा हा 32 वर्षीय तरुण ट्रायडेन्ट क्रिएशन कंपनीत सिनिअर कर्मचारी होता. त्याने कंपनीच्या पैशाचा गोलमाल करून दोन मोठ्या रक्कमेची कर्जे फेडली. त्यापैकी 30 लाखांचे कर्ज क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्यासाठी घेतले होते. याशिवाय दुसऱ्या 10 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली.

विशेष म्हणजे, स्वतःच्या राजेशाही लग्नावर तब्बल 16 लाख रुपये तसेच नववधूला हनिमूनला नेण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च केले होते. हा सर्व खर्च कंपनीच्या पैशांच्या गैरव्यवहारातून केल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच 15 लाख रुपये शेअर्स आणि मुचूअल फंडामध्ये गुंतवल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून हा गैरव्यवहार केला आहे.