
पश्चिम बंगालमधील 27 वर्षीय नवाब शेख या तरुणाने पत्नीचे दागिने विकून एक भन्नाट ‘बेड गाडी’ बनवली. केवळ प्रसिद्धीसाठी बनवलेल्या या अनोख्या निर्मितीमुळे चाकांवर फिरणारा बेड सर्वांचे लक्ष वेधत आहे. मात्र स्थानिक डोमकल पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल हे वाहन जप्त केले आहे. नवाब पेशाने वाहन चालक असून त्याने बनवलेली भन्नाट कार इतर वाहनांसारखी सुसज्ज आहे. यामध्ये गादी, उशा, चादरी, बाजूला ड्रायव्हरची सीट, स्टीअरिंग, आरसा आणि ब्रेकचा पर्याय आहे.
नवाब महिन्याला 9 हजार रुपये कमावतो. मात्र व्हायरल होऊन प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने पत्नीचे दागिने विकून पैसे जमवले. नवाबची पत्नी मेहर नेगरने पतीच्या कार्याला दाद दिली. आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान वाटतो. त्याने खूप मेहनत घेतली, पण काहींनी त्याच्या व्हिडीओची चोरी केली. सरकारने त्याला आता काही आर्थिक मदत करावी अशी आमची इच्छा आहे, असे तिने सांगितले. नवाबकडे संबंधित वाहन चालवण्यासाठी वैध कागदपत्रे किंवा अधिकाऱ्यांच्या परवानगीची प्रत नसल्यामुळे हे वाहन सध्या पोलिसांनी जप्त केले आहे.
2.15 लाख रुपयांचा खर्च
राणीनगर ते डोमकलदरम्यान नवाबने या वाहनाने प्रवास केला असता अनोख्या वाहनाची झलक पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. हे वाहन तयार करण्यासाठी दीड वर्षाहून अधिक वेळ लागला. प्रसिद्धी मिळवणे हे त्याचे स्वप्न होते. यासाठी इंजिन, स्टीअरिंग, इंधन टाकी आणि एका छोट्या कारची बॉडी असे पार्टस् नवाबने खरेदी केले. लाकडी बेड स्ट्रक्चर बांधण्यासाठी त्याने एका सुतारालाही कामावर ठेवले. हा संपूर्ण प्रकल्प करण्यासाठी एकूण 2.15 लाख रुपयांचा खर्च आला, असे नवाब सांगतो.