काही दिवसांपूर्वी उन्हाच्या काहिलीत होरपळणारे दिल्लीकर आता मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडले आहेत. याच वादळी पावसामुळे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 च्या छताचा काही भाग पहाटे कोसळून 1 महिला ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. छताचा खाली आलेला भाग वाहनांवर कोसळल्यामुळे काही पॅब आणि मोटारी पार चेपल्या गेल्या आहेत.
पहाटे घडलेल्या या दुर्घटनेनंतर विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला होता. दुपारी 2 वाजेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. मृत महिलेच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 3 लाखांची भरपाई हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी जाहीर केली.
उड्डाणे रद्द
पार्ंकग लॉटवर विमानतळाच्या छताचा भाग कोसळल्यावर विमानतळ आणि सरकारी यंत्रणांची एकच धावपळ उडाली. जगातील सर्वात व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल एकवरून दुपारी 2 वाजेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दुपारी दोन नंतरची विमान वाहतूक टर्मिनल 2 आणि 3 वरून सुरू करण्यात आली.
छताचा पत्रा आणि सपोर्ट बीम कोसळून टर्मिनलच्या पिक-अप आणि ड्रॉप एरियामध्ये उभ्या असलेल्या गाडयांवर पडल्यामुळे चार गाडय़ांचे नुकसान झाले. पहाटे 5.30 च्या सुमारास या घटनेची माहिती दिल्ली अग्निशमन सेवेला देण्यात आली.
पावसाची संततधार
दिल्लीत गुरुवारी रात्री उशिरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे टर्मिनल 1 चे छत आणि सपोर्ट बीमही कोसळले. अनेक टॅक्सी आणि मोटारींचे नुकसान झाले. काही वाहनांमध्ये बसलेले सहा जण जखमी झाले. आणखी काही वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दुपारपर्यंत मदत पथके काम करत होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे दिल्ली एनसीआरमधील अनेक भाग पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी साचले आहे.
टर्मिनलमधून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे हे आमचे तात्काळ प्राधान्य होते. त्यामुळे दुपारी 2 वाजेपर्यंतच्या सर्व फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना पूर्ण परतावा मिळेल किंवा पर्यायी फ्लाइट आणि मार्गांवर पुन्हा बुकिंग करण्याचा पर्याय असेल. दुपारी 2 नंतर रवाना होणारी उड्डाणे T2 आणि T3 वरून चालविली जातील, अशी माहिती हवाई वाहतूक मंत्री नायडू यांनी दिली. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तज्ञांकडून टर्मिनलच्या संरचनेची सखोल तपासणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
मोदीजी, तुमची घाई देशाला नडली
अटल सेतूला तडे गेले, जबलपूर विमानतळाचे छत कोसळले, दिल्ली विमानतळाचे छत कोसळून एक व्यक्ती ठार झाली, राम मंदिराचे गर्भागार पाण्यात बुडले… मोदीजी, कामे पूर्ण होण्याआधीच उद्घाटन करून मिरवण्याची तुमची घाई देशाला नडलीय, अशा शब्दांत आज काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी मोदींची झाडाझडती घेतली.
n अटल सेतू बांधण्यासाठी 18 हजार कोटी खर्ची पडले, मोदींनी 12 जानेवारी 2024 रोजी या सेतूचे उद्घाटन केले होते. अवघ्या काही महिन्यांतच या सेतूवर तडे गेले आहेत.
n जबलपूर विमानतळासाठी 450 कोटी खर्च झाले. मोदींनी 10 मार्च 2024 रोजी या विमानतळाचे उद्घाटन केले होते. या विमानतळ छताचा भाग मध्यंतरी तुटून खाली आला होता.
n आज दिल्ली विमानतळावर टर्मिनस वन येथे तेच झाले. n अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणासाठी 1800 कोटींचा खर्च झालाय. मोदींनी उद्घाटन केले खरे, पण मंदिराच्या गर्भगारात पाणी साचले आहे.