लिपस्टिक लावल्याने महिला कर्मचाऱ्याची बदली, चेन्नई पालिकेतील अजब घटना

लिपस्टिक लावल्यामुळे ग्रेटर चेन्नई महानगरपालिकेच्या महिला मार्शलची तडकाफडकी बदली झाली. महापौरांनीच या महिला कर्मचाऱ्याच्या बदलीचे आदेश काढले. यामुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली. एस. बी. माधवी (50 वर्षे) असे बदली झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. माधवी या ग्रेटर चेन्नई महानगरपालिकेत मार्शल म्हणून कार्यरत आहेत. महापौर आर. प्रिया यांनी माधवी यांची तडकाफडकी बदली केली. ट्रान्सफर ऑर्डरमध्ये बदलीचे जे कारण देण्यात आले आहे ते पाहून माधवी यांना धक्का बसला.

महापौर आर. प्रिया यांनी माधवी यांना लिपस्टिक लावून कार्यालयात येऊ नये अशा सूचना केल्या होत्या. मात्र तरीदेखील माधवी या भडक रंगाची लिपस्टिक लावून येत होत्या. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. महापौर आर. प्रिया यांनी माधवी यांना लिपस्टिक लावून कार्यालयात येऊ नये अशा सूचना दिल्या होत्या.

महापौरांचा खुलासा

माधवी यांची बदली करणाऱ्या महापौर यांनी याबाबत खुलासा केला. भडक रंगाची लिपस्टिक लावून येऊ नये अशा सूचना माधवी यांना करण्यात आल्या होत्या. कामावर उशिरा येणे, कामात निष्काळजीपणा, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न करणे अशा कारणांमुळे माधवी यांची बदली करण्यात आल्याचे महापौर म्हणाल्या.