नोकरदारांसाठी अनोखा प्रयोग, लाखभर रुपये मिळाले तरी कामधंदा सोडला नाही!

जर्मनीमध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात लोकांना सध्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कम विनाशर्त दिली गेली. जास्त रक्कम हातात आल्याने लोक काम करणे सोडतील का? हे जाणून घेणे हा प्रयोगाचा उद्देश होता. परंतु यात असे आढळून आले की, लोकांनी नोकरी-व्यवसाय सोडला नाही. उलट त्यांना जीवनात अधिक संतुलन, समाधान मिळाले व ते कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकले. बर्लिनच्या ‘माइन ग्रुंडआइनकोम्मेन’ (माझे बेसिक उत्पन्न) संस्थेने हा अभ्यास केला. यात 21 ते 40 वयोगटातील 122 लोकांना जून 2021 ते मे 2024 पर्यंत दरमहा 1.20 लाख रुपये दिले. त्यांना ही रक्कम कशीही खर्च करण्याचे स्वातंत्र्य होते. काहींना वाटते की, माणसाला काम न करता पैसे मिळू लागले तर ते काम करणे थांबवतील, परंतु या अभ्यासात असे काहीही घडले नाही.