मालाडला राहणारा तरुण कॅमेऱ्याची डिलिव्हरी देण्यासाठी गोरेगावहून लोकलने दादरला निघाला. पण दादर स्थानकात गर्दीमुळे कॅमेऱ्याची बॅग लोकलमध्येच राहिली आणि तो बाहेर फेकला गेला. नंतर त्याने जाऊन शोधाशोध केली असता कॅमेरा चोरीला गेल्याचे लक्षात आले. दरम्यान याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीवरून मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा शोध घेऊन तीन लाख किमतीचा कॅमेरा हस्तगत केला.
दीपक अग्रहरी (25) हा तरुण कॅमेऱ्याची डिलिव्हरी देण्यासाठी गोरेगाव स्थानकात लोकल पकडून निघाला. दादर स्थानकात उतरायचे असल्याने त्याने तो त्यासाठी तयारीत राहिला; परंतु गर्दीमुळे कॅमेऱ्याची बॅग लोकलच्या डब्यात राहिली आणि दीपक उतरताना बाहेर फलाटावर पडला. त्याने दुसरी लोकल पकडून मागे जात त्या लोकलमध्ये कॅमेऱ्याचा शोध घेतला, परंतु कॅमेरा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे दीपकने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन वरळीत राहणाऱ्या रियाजुद्दीन मलिथया (32) या तरुणाला पकडले. त्याच्याकडून चोरीचा कॅमेरा हस्तगत केला.