शंभर वर्षांची संगीतमय परंपरा ‘हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी’ची यशस्वी घोडदौड

मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असा पूर्वापार समज आहे; मात्र मराठी माणूस व्यवसायात गगनभरारी घेऊ शकतो आणि तो व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवूदेखील शकतो हे दादरच्या ‘हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी’ने सिद्ध केले आहे. संगीत वाद्यांची निर्मिती आणि विक्री करणारी ही संस्था लवकरच शतक महोत्सवात दिमाखात पदार्पण करणार आहे.

हरिभाऊ विश्वनाथ दिवाणे यांनी 1925 साली दादर पश्चिमेला स्वतःच्या नावाने कंपनी सुरू केली. त्यावेळी येथे पत्र्याच्या साध्या शेडमध्ये हार्मोनियम, ग्रामोफोन दुरुस्तीचे काम चालायचे. पुढे त्यांनी हार्मोनियम, मेंडोलीन, व्हायोलीन, तबला-डग्गा अशा वाद्यांची निर्मिती करण्यासाठी पुंभारवाडा आणि नगरला कारखाना सुरू केला. पंपनीच्या आता दादरसह गिरगाव आणि प्रभादेवीत शाखा असून येथे हार्मोनियम, तबला, सतार, तानपुरा, ढोलकीसह की-बोर्ड, गिटार, मेंडोलीन, व्हायोलीन अशी शंभरहून अधिक वाद्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पंडित भीमसेन जोशी, वसंत देसाई, माणिक वर्मा, प्यारेलाल, यशवंत देव, अशोक पत्की अशा दिग्गजांनीदेखील या दुकानाला भेट दिली आहे. दादरच्या शाखेचे व्यवस्थापन 1978 पासून हरिभाऊ यांचे पुतणे उदय दिवाणे सांभाळत आहेत. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने बेला शेंडे, वैशाली माडे, आर्या आंबेकर, उर्मिला धनगर, शरयू दाते या कलाकारांसोबत अल्बमची निर्मिती केली आहे.

शंभरी दणक्यात साजरी करू
कंपनीच्या अमृतमहोत्सवी वर्षी पं. शिवकुमार शर्मा, तुळशीदास बोरकर, नौशाद या दिग्गजांचा कार्यक्रम झाला होता. अशाच दिग्गज कलाकारांना घेऊन शंभरीनिमित्त आम्ही जानेवारीत एखादा वाद्य संगीताचा दर्जेदार कार्यक्रम आयोजित करू, असे उदय दिवाणे यांनी सांगितले.

ऑनलाइन खरेदीचा फटका
लॉकडाऊनपासून ग्राहकांना ऑनलाइन खरेदीची सवय लागलीय. वाद्यांच्या खरेदीसाठी आता दुकानात पूर्वीसारखी गर्दी नसते. येथे येणारे ग्राहक आमच्या वाद्यांची क्वालिटी बघण्यापेक्षा ऑनलाइन किमती किती स्वस्त आहेत याची तुलना करतात, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

संगीतसेवा अविरत सुरू ठेवू
आमची दादरमधील शाखा बंद होतेय असे मेसेज दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरतायत. या अफवांमुळे आम्हाला खूप मनस्ताप सहन करावा लागतोय. कुणीही या अफवांवर विश्वास ठेवू नका. संगीताची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा. यापुढेही आम्ही संगीताची सेवा अशीच अविरत सुरू ठेवू, असे उदय दिवाणे यांनी सांगितले. दादरला गर्दी खूप वाढलीय. गर्दीमुळे ग्राहकांना येथे गाडी पार्ंकगसाठी जागा नसते. वयानुसार माझ्या प्रकृतीच्यादेखील काही समस्या आहेत. त्यामुळे शंभरीनंतर दादरचे दुकान प्रभादेवीच्या शाखेत शिफ्ट करू, असेही त्यांनी सांगितले.