ओव्हरटेकच्या नादात जे जे पुलावर स्कूलबसचा अपघात, एक विद्यार्थी जखमी

पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कूलबस रेलिंगवर आदळून अपघात झाल्याची घटना जे जे पुलावर बुधवारी दुपारी घडली. या अपघातात बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला असून, एक 12 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलाला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. लालूकुमार संतू असे आरोपी चालकाचे नाव आहे.

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

एकूण 20 मुलांना घेऊन स्कूलबस जे जे पुलावरुन चालली होती. पुलावर पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित बस पुलाच्या रेलिंगवर धडकली. या धडकेत बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. बसमधील 12 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचारा सुरू आहेत.

बस चालक पोलिसांच्या ताब्यात

अपघाताची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बसमधील अन्य विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढत बेस्ट बसने घरी पोहचवण्यात आले. पोलिसांनी बसच्या चालकाला ताब्यात घेत त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.