![mahakumbh (3)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mahakumbh-3-1-696x447.jpg)
प्रयागराज येथे महाकुंभदरम्यान मौनी अमावस्येला अमृत स्नानाआधी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या मोठी असण्याची भीती व्यक्त होत आहे. आताही माघ पोर्णिमेनिमित्त महाकुंभातील पाचवे स्नान होत आहे. यासाठीही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. आता उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रशांत कुमार यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी मौनी अमावस्येच्या दुर्घटनेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
प्रयागराज येथे महाकुंभ सुरू आहे. माघ पोर्णिमेनिमित्त प्रयागराजमध्ये त्रिवेणी स्नानासाठी प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, येथे येणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्रिवेणी स्नानासाठी जाण्यासाठी भाविकांनी 10 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. तसेच वाहनांना शहरात प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बॅरिकेट्स उभारल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी माहिती दिली. याआधी मौनी अमावस्येला अमृत स्नानाआधी आमच्याकडून छोटीशी चूक झाली, असे वक्तव्य करत ती दुर्घटना छोटीशा असल्याचे वक्तव्य केले आहे.
डीजीपी प्रशांत कुमार म्हणाले की, महाकुंभमधील हे पाचवे स्नान आहे. आता यानंतर महाशिवरात्रीचे स्नान होणार आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी आमच्याकडून एक छोटीशी चूक झाली. त्यातून शिकत आम्ही त्याचे व्यवस्थापन कसे चांगले करायचे यावर काम करत आहोत. आम्ही आता उत्तम व्यवस्थापन तंत्र स्वीकारले आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही दुर्घटना किंवा अनुचित घटना घडणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत 46 ते 47 कोटी लोक महाकुंभात आले आहेत. आज माघ पोर्णिमेच्या पर्वानिमित्त 10 वाजेपर्यंत 1 कोटी 3 लाख भाविकांनी स्नान केले आहे. प्रयागराजसह आमचे चित्रकूट, काशी विश्वनाथ मंदिर, विंध्याचल मंदिर, अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर लक्ष आहे. प्रयागराज येथ स्नान केल्यानंतर भाविक या स्थळांना भेट देतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही. याची काळजी घेण्यात येत आहे. आम्ही लखनऊमध्ये एक वॉर रूम तयार केली आहे, आमच्याकडे 2500 हून अधिक कॅमेरे सक्रिय आहेत. आम्ही त्या सर्वांचे लाईव्ह फीड घेत आहोत,असेही ते म्हणाले.
मुख्य स्नानाच्या दिवशी रेल्वे 400 हून अधिक गाड्या चालवत आहे आणि दररोज सुमारे 350 गाड्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे स्नानाशिवाय इतर दिवशीही भाविकांची गर्दी वाढत आहेत. एवढ्या मोठ्या गर्दीचे नियोजन करणे ही कठीण बाब आहे. मात्र, आम्ही हे सर्व करत आहोत. अशी प्रकारे तयारीची माहिती देताना त्यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केल्याने संताप व्यक्त होत आहे.