
तालुक्यातील निकळक शिवारात सकाळच्या वेळेस रस्त्यावर रनिंग करणाऱ्या तरुणीला तीन मोटारसायकलवर पाठीमागून येत अज्ञात सहा जणांनी येऊन विनयभंग केला. चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. ही घटना सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडल्याने बदनापूर तालुक्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे सिद्ध होत आहे.
बदनापूर शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. 12 सप्टेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील निकलक परिसरात तरुणीला चाकूने वार करून जखमी केले. निकलक येथील तरुणी सकाळी वाल्हा रोडवर रनिंग करीत असतांना तीन मोटारसायकलींवर अज्ञात सहा जण आले. तरुणीचा हात ओढून पोटावर, हातावर, पायावर चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. तरुणीच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. जी. जैस्वाल हे करीत आहे.
निकळक येथील तरुणी सकाळी जॉगिंगसाठी गेली असता अज्ञात आरोपीने तिच्यावर हल्ला करून तिला जखमी केले. रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या तक्रारीवरून आरोपीचा शोध वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मुली महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. जी. जैस्वाल यांनी सांगून लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळू, असे सांगितले.
6 जणाविरूद्ध गुन्हा
भावी पोलीस तरुणीवर चाकूने हल्ला चढवत तिचा विनयभंग करणाऱ्या 6 जणांविरूद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तुला, तुझ्या वडिलाला मारून टाकू अशी धमकीसुद्धा तिला दिली.
घटनेकडे गांभीर्याने लक्ष अन्यथा आंदोलन
दिवसाढवळ्या महिलावर हल्ले होत आहे, बदनापूर पोलीस उदासीन आहेत, महिला सुरक्षित नाही, पोलीस प्रशासनाचा कोणताच धाक गुन्हेगारावर राहिलेला नाही, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा युवा सेना आंदोलन करेल, असा इशारा उपतालुका युवा अधिकारी ऋषी थोरात यांनी दिला आहे.