घरात खेळताना अवघ्या सात महिन्यांच्या बाळाने गिळलेल्या तीन चाव्यांचा संच श्वासनलिका आणि धमन्यांना असलेला धोका पत्करून अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यास घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांना आज यश आले. यामुळे बाळाचे प्राण वाचले. या यशस्वी कामगिरीबद्दल शिवसेना विभागप्रमुख सुरेश पाटील, माजी महापौर महादेव देवळे, घाटकोपर पूर्व विधानसभेतील पदाधिकारी चंद्रपाल चंदेलिया, प्रकाश वाणी, रवींद्र कोठवदे, प्रसाद कामतेकर, विलास लिंगाडे व शिवसैनिकांनी रुग्णालयात भेट देऊन बाळाच्या तब्येतीची विचारपूस केली व राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले.
घरात लादीवर खेळता खेळता अवघ्या सात महिन्यांच्या बाळाने एकाच वेळी तीन चाव्या गिळल्या. चाव्या बाळाच्या श्वासनलिकेत अडकल्यामुळे बाळाची प्रकृती बिघडली. बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी बाळाला राजावाडी रुग्णालयात आज सकाळी 10 वाजता दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने बाळाचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. बाळाला श्वास घेताना त्रास होत असल्यामुळे प्रकृती अतिशय चिंताजनक होती. ईएनटी सर्जन डॉ. देविका शेरे, भूल विभागाचे प्रमुख डॉ. रीना नेबू व डॉ. सोप्रिया येंपले या डॉक्टरांच्या टीमने उपचार-तपासणी सुरू केले.
धमन्यांसह जिवाला निर्माण झाला धोका
चाव्यांचा संच बाळाच्या घास व श्वासनलिकेत अडकलेल्या असून त्यामुळे बाळाच्या धमन्यांना मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. ईएनटी सर्जनांच्या म्हणण्यानुसार, पहिल्यांदाच अशा प्रकारची गंभीर घटना समोर आली आहे, परंतु डॉक्टरांच्या टीमला अगदी सतर्कतेने ऑक्सिजनेशन आणि सक्शनिंगद्वारे दोन चाव्या बाहेर काढण्यात यश आले. उपचार-तपासणीदरम्यान तिसरी चावी बाळाच्या नाकाच्या गुहेत अडकली होती. त्या चावीलादेखील आम्ही सफलतापूर्वक काढले, अशी माहिती डॉ. रीना नेबू यांनी दिली.