लोकलच्या धडकेत गंभीर जखमी श्वानाला पालिकेकडून जीवदान

कुर्ला रेल्वे स्थानकात ट्रेनच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका श्वानाला पालिकेच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. पालिका, रेल्वे प्रशासन व स्वयंसेवी संस्थेच्या तत्परतेमुळे जखमी श्वानाला वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे या श्वानाचा जीव वाचला. मात्र गंभीर जखमी एका श्वानाचा मात्र यामध्ये मृत्यू झाला.

कुर्ला स्थानकातील उपस्थानक व्यवस्थापक रवी नांदुरकर यांनी पालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडे दोन श्वान रेल्वेच्या धडकेत जखमी झाल्याची माहिती दिली. या माहितीनंतर पालिकेच्या वाहनाने जखमी झालेल्या श्वानाला उपचारासाठी देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी तत्काळ वाहन उपलब्ध करून दिले. पालिकेशी संलग्न असलेल्या बाई सकरबाई दिनशॉ पेटिट ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी स्थानक परिसरात पोहचून ट्रस्टच्या परळ स्थित रुग्णालयात जखमी श्वानाला दाखल केले. तातडीने उपचार मिळाल्याने या श्वानाचा जीव वाचला. दरम्यान, श्वानांशी संबंधित तक्रारीसाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांनी https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंकवर तक्रार अथवा सूचना दाखल करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.