हद्दच झाली राव.. काम न करता दहा लाखांची बिले ढापण्याचा डाव, मुरबाडमध्ये कंत्राटदाराने देवालाही फसवले; गावकऱ्यांनी भंडाफोड केल्याने पितळ उघडे

भाजप, मिंध्यांच्या काळात कंत्राटदारांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठिकठिकाणी भ्रष्टचार केला जात आहे. आता मुरबाडमध्ये असाच धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. धसईजवळील पिंपळघर परे येथे असलेल्या पिंपळेश्वर मंदिरात रुपयाचे काम न करता कंत्राटदाराने तब्बल दहा लाखांची बिले ढापण्याचा डाव आखला होता. तशी कागदपत्रेच ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात रंगवण्यात आली होती. हरिहरसेवा मंडळ व गावकऱ्यांनी याचा भंडाफोड केल्याने देवाला फसवणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. दरम्यान या घोटाळ्याच्या मास्टरमाईंडचे नाव स्पष्ट झाले नसले तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मुरबाड तालुक्यात पिंपळघर परे येथे पिंपळेश्वर देवस्थान आहे. 25 ते 30 वर्षांपूर्वी येथे भाविकांसाठी एक मठ बांधण्यात आला असून नदीपात्रात शिवमंदिरदेखील उभारले आहे. जीर्ण झालेल्या या वस्तूची गावकरी व देवस्थान मंडळ आपापल्यापरीने दुरुस्थीची कामे करत असते. लग्न, दशक्रिया विधी, आरोग्य शिबिरे, उत्तरकार्य यांसह अन्य कार्यक्रम नेहमीच येथे होत असतात. काही सेवाभावी व्यक्तीनी येथे मठासमोरील अंगणात लोंखडी पत्र्याचे शेडदेखील उभारले आहे, या तिर्थक्षेत्रासाठी येथील दानशूर शेतकरी लहू मोहपे यांनी 40 गुंठे जागा दान केली आहे. कमिटीने स्वतः खर्च करत पाच ब्रास पेव्हर ब्लॉकचेदेखील काम केले आहे.

संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्याशिवाय एकही रुपया दिला जाणार नाही.

• संजय कोरडे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, मुरबाड विशेष म्हणजे आजपर्यंत या देवस्थानाचे सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाचे काम केलेले नाही. असे असताना या कामांचे पैसे मिळावे यासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडे दहा लाखांची बिले अदा करण्याची मागणी केली आहे.

रंगवलेले पत्र पाहून डोक्यात तिडीक गेली

हरिहरसेवा मंडळाचे सचिव हरिश्चंद्र पष्टे हे ठाणे जिल्हा परिषदेत एका कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एका अधिकाऱ्यांने पिंपळेश्वर मंदिरात केलेल्या कामाची रक्कम अदा करण्यासंदर्भात मागणी पत्र दाखवले. हे पात्र पाहून हरिश्चंद्र पष्टे यांच्या डोक्यात तिडीक गेली. सरकारी निधीतून एक काम केले नसताना लाखो रुपयांचा झोल नेमका कोण करत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.