
सुप्रसिद्ध संगीत आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रेहमान यांना आज सकाळी डिहायड्रेशनमुळे चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. रेहमान यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताचे बहीण ए.आर. रेहाना यांनी खंडन केले. रहमान यांना डिहायड्रेशन आणि गॅस्ट्रिकचा त्रास होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
रेहमान यांचे व्यवस्थापक सेंथिल वेलन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी मानदुखीची तक्रार केली होती. सध्या ते घरी परतले असून प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या आणि कोणताही धोका नसल्याचे सांगितले. दरम्यान, रेहमान यांचा मुलगा ए.आर. आमीनने त्याच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनचा फोटो शेअर केला आहे.
एक यशस्वी संगीतकार म्हणून ए.आर. रेहमान यांची ओळख आहे. रेहमान यांना दोन ग्रॅमी, दोन अकादमी, एक गोल्डन ग्लोब आणि सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक बाफ्टा, तसेच हिंदुस्थानचा तिसरा सर्वेच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण या नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.