सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात विविध मंदिरांच्या प्रतिकृती उभारण्यात येतात. यंदा कांदिवली ठाकूर व्हिलेज येथील हाथवे साई स्टार गणेशोत्सव मंडळातर्फे रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांच्या रांगा लागत आहेत.
हाथवे साई स्टार गणेशोत्सव मंडळ यंदा रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब आणि उद्योजक सदानंद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन केले जाते. नितीन केणी आणि शंकर नायर या दोन भागीदारांसवेत यावेळी तीन तरुणांनी या गणेशोत्सवाची विशेष जबाबदारी पार पाडली आहे.
अनिकेत कदम, आकाश नायर आणि ओजस केणी हे तरुण या गणेशोत्सवासाठी अग्रभागी असतात. वेगवेगळे देखावे हे या गणेशोत्सवाचे आकर्षण असल्याने भाविकांची दरवर्षी येथे प्रचंड गर्दी उसळते. नीट परीक्षांचा घोटाळा, कोकणातील रस्ते आणि कश्मीरातील चकमकी हे तीन विषय घेऊन यावेळी देखावा उभारला आहे.