आंध्र प्रदेश, तामीळनाडू, केरळ आणि कर्नाटकात कोंबडय़ाच्या सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेत सर्वात सुंदर कोंबडीला पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळते. काही वेळा फ्रीज आणि टीव्हीसारखी बक्षिसे दिली जातात. या कोंबडय़ांची किंमत लाख रुपयांच्या आसपास असते.
सौंदर्य स्पर्धेसाठी आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिह्यातील राजुपलेम गावात राहणारे सय्यद बाशा अशा कोंबडय़ा तयार करतात. हे त्यांचे वडिलोपार्जित कार्य आहे. स्वतःच्या शेतात ते पोपटासारखी चोच आणि मोराच्या शेपटी असलेली कोंबडी तयार करतात. या कोंबडीची अंडी हजार रुपयाला विकली जातात. सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी तीन महिने आधी या कोंबडय़ांना उकडलेली अंडी, काजू आणि बदाम असा खुराक खायला दिला जातो. त्यांच्या कोंबडीने यापूर्वी अनेकदा सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत.