दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या एका सोसायटीत परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी माणसे घाणेरडी आहेत असा थयथयाट करत देशमुख कुटुंबाला बेदम मारहाण केली. फोर्टच्या डाबर कंपनीमध्ये ‘एक बिहारी सब पे भारी’ अशी मुजोरी करत तेथील मॅनेजर मराठी कर्मचाऱ्याला नाहक मनस्ताप देत होता. या घटना ताज्या असतानाच आता पेणमध्येही एका परप्रांतीय भाजी विक्रेत्या महिलेच्या दादागिरीचा व्हिडीओ समोर आला आहे. मै मराठी नही बोलुंगी… तुम हिंदी बोलो, अशी दादागिरी परप्रांतीय भाजीवाल्या महिलेने मराठी माणसासोबत केली. तिची मुजोरी इतक्यावरच थांबली नाही तर तिने हम में दम है इस लिये यहां आकर धंदा करते है. तुम में दम है तो यूपी में जाकर कमावो, अशी मग्रुरीची भाषाही केली.
पेण शहरातील राजू पोटे मार्गावर अंती विश्वकर्मा ही परप्रांतीय महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. अनेकदा ती ग्राहकांशी वाद घालत असते. टोमॅटो घेण्यासाठी एक दांपत्य तिच्याकडे गेले असता तिने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावर ग्राहकाने मराठीत बोलण्यास सांगितल्यावर महिला विक्रेती भडकली आणि मैं मराठी नही बोलुंगी… तुम हिंदी में बात करो… जब तुम लोगों को यूपी वाले नही चलते तो पाप धोने काशी-बनारस नहाने क्यू जाते हो. हमारे में दम है इस लिये यहां आकर धंदा करते है. तुम में दम है तो यूपी में जाकर कमावो, या मुजोर भाषेत ती मराठी दांपत्याशी हुज्जत घालत होती. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
शिवसेनेच्या दणक्यानंतर लेखी माफीनामा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा समन्वयक नरेश गावंड व महिला आघाडीच्या मेघना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी घटनास्थळावर धडक देत अंती विश्वकर्मा या परप्रांतीय महिलेला खडसावून जाब विचारला, त्यानंतर तिची बोबडी वळली. मला माफ करा, मी मराठीचा द्वेष करणार नाही, असे म्हणत अंती विश्वकर्माने पोलीस ठाण्यात लेखी माफीनामा लिहून दिला.