तामिळनाडूत टाटाच्या आयफोन प्लान्टला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

तामिळनाडूतील टाटाच्या आयफोन प्लान्टमध्ये शनिवारी पहाटे 5.30 च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्नीशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

तामिळनाडूतील कृष्णगिरी येथे टाटाच्या आयफोन प्लांटमध्ये मोबाईल फोन ॲक्सेसरीज पेंटिंग युनिटमध्ये आग लागली. आग लागली तेव्हा कंपनीत 1500 कामगार ड्युटीवर होते. यावेळी तीन कामगारांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (TEPL) च्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले आहे. “तामिळनाडूच्या होसूर येथील आमच्या प्लांटमध्ये आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आमच्या आपत्कालीन प्रोटोकॉलने सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची खात्री केली. आगीचे कारणाचा तपास सुरू आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचे आणि इतर भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक कृती करू”, असे निवेदनात म्हटले आहे.