महाडच्या कोंझर घाटात लक्झरी बस दरीच्या तोंडावर अडकलीः 50 प्रवासी बालबाल बचावले

रायगड किल्ला बघितल्यानंतर नवी मुंबईच्या दिशेने निघालेली शिवभक्तांची खासगी लक्झरी बस आज संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास महाडच्या कोंझर घाटात येताच दरीच्या तोंडावर अडकली. पण चाके चिखलात रुतल्यामुळे 50 प्रवासी बालबाल बचावले. अन्यथा ही बस खोल दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रात्रीच्या अंधारातही बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आपला जीव वाचला, अशीच भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

नवी मुंबईतील 50 शिवभक्त रायगड किल्ला पाहण्यासाठी गेले होते. खाली उतरल्यानंतर आज संध्याकाळी स्वामी समर्थ ट्रॅव्हल्सच्या बसमधून सर्वजण पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देताच ही बस सुटली. रिमझिम पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. ही बस महाडच्या कोंझर गावाजवळील एका वळणावर येताच बसचालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्यालगत काही फूट अंतरावरून खाली गेली. आता आपली बस दरीत कोसळणार या भीतीने प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडू लागले. आतील लहान मुले व महिलाही घाबरल्या.

कोंड्झर घाटातील रस्त्यावर चिखल असल्याने बसची चाके त्यात रुतली व काही फूट अंतरावर जाऊन अडकली. घाटात अंधार होता. काय करावे हे कोणालाच कळेना. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून लगतच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी, खासगी रुग्णवाहिकादेखील आल्या. रेस्क्यू टीमने व ग्रामस्थांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून कोणतीही इजा न होता सुखरूप बाहेर काढले.

चिखल आमच्यासाठी देवदूत ठरला

रस्त्यावरील तो चिखल जणू आमच्यासाठी देवदूत ठरला म्हणूनच आमचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया बसमधील प्रवासी कृषीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. चिखल नसता तर आमचे काय झाले असते याची कल्पनाही करता येत नाही.

अंबेनळी घाटातील आठवणी ताज्या

कोंझर घाटातील या अपघातामुळे 28  जुलै 2018 रोजी अंबेनळी घाटात झालेल्या मोठ्या अपघाताच्या आठवणी आज ताज्या झाल्या. या अपघातात 33 जण ठार झाले होते. दापोली विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची बस महाबळेश्वरकडे जात असताना हा अपघात झाला.